मुंबई प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सुमारे अडीच कोटी रुपये किमतीच्या लक्झरी SUVने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या अपघातात २० वर्षीय स्विगी डिलिव्हरी बॉय शुभम प्रजापती याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी कारचालक युवराज बाहेती (२८) याला अटक केली आहे.
शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास शुभम दुचाकीवरून पार्सल पोहोचविण्यासाठी जात असताना भरधाव लक्झरी SUVने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की शुभमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळला. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांच्या गस्ती पथकाने त्याला तातडीने भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र, मध्यरात्री १२.१२ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी शुभमच्या खिशातील ओळखपत्राच्या आधारे त्याची ओळख पटवून कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. अवघ्या एका पार्सलच्या डिलिव्हरीसाठी घराबाहेर पडलेल्या शुभमचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजस्थान पासिंगच्या SUVचा चालक अटकेत
अपघातास कारणीभूत ठरलेली काळ्या रंगाची SUV राजस्थान पासिंगची असून, ती महालक्ष्मी येथील आयात-निर्यात व्यावसायिकाच्या मुलाची असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. कारचालक युवराज बाहेती याला पोलिसांनी अटक केली. अपघाताच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
खार येथून महालक्ष्मीतील घरी जात असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर बाहेती घटनास्थळावरून पसार न होता तेथेच थांबला आणि त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता जामीन मंजूर करण्यात आला. निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वांद्रे पोलिस करीत आहेत.

