ठाणे प्रतिनिधी
‘ढाक्कुमाकुम… ढाक्कुमाकुम…’च्या तालावर उंचच उंच मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी ठाणेकर सज्ज झाले आहेत. गोपाळकाळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मानाच्या दहीहंड्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदाचा उत्सव केवळ गोविंदा पथकांच्या थरारापुरता मर्यादित राहणार नाही. विश्वविक्रमाचे आव्हान, लाखो रुपयांची बक्षिसे आणि मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती हे यंदाच्या दहीहंडी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
टेंभी नाका, तलावपाळी, वर्तकनगर, रघुनाथनगर, हिरानंदानी मेडॉस, नौपाडा आणि रेमंड परिसरात भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख मंडळांनी गोविंदा पथकांच्या स्वागतासाठी तसेच सुरक्षिततेसाठी जय्यत तयारी केली असून, विविध थरांसाठी रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे दहीहंडी फोडण्याच्या चुरशीसोबतच बक्षिसांसाठी गोविंदा पथकांमध्ये मोठी स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.
वर्तकनगरमध्ये विश्वविक्रमाचे आव्हान
वर्तकनगर येथे प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी यंदा विशेष चर्चेत आहे. विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल २५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच १० थर रचणाऱ्या पथकासाठी ११ लाख रुपयांचे बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी जाहीर करण्यात आली आहे.
याशिवाय विविध थरांसाठी स्वतंत्र पारितोषिके आणि सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. महिला गोविंदा पथकांनाही प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पारितोषिक ठेवण्यात आले आहे. यंदाच्या उत्सवातून अभिजात आणि समृद्ध मराठी भाषेचा गौरव करण्याचा संकल्पही करण्यात आला आहे.
संकल्प प्रतिष्ठानची २१ वी दहीहंडी
रघुनाथनगर, वागळे इस्टेट येथे रविंद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे २१ व्या भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गोविंदांच्या थरारासोबतच मनोरंजनाचा तडका हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य असणार आहे.
‘हास्य जत्रा’ फेम अमीर हडकर, अभिनेता दिगंबर नाईक, दीपक वेतकर, राजू फाटक, गायिका श्वेता दांडेकर, ‘सूर नवा ध्यास नवा’च्या तिसऱ्या पर्वातील गायक मनुव्वर अली, अभिनेते नागेश मोरवेकर, अभिनेत्री विदुला चौगुले, पार्श्वगायिका अबोली गिऱ्हे, गायक आदेश तेलंग, नृत्यांगना सायली पराडकर आणि गायक मंगेश शिर्के आदी कलाकारांची उपस्थिती राहणार आहे.
त्यामुळे गोविंदा पथकांच्या चुरशीबरोबरच संगीत, नृत्य आणि विनोदाची मेजवानी ठाणेकरांना अनुभवता येणार आहे.
रेमंडमध्ये गोविंदांचा जल्लोष
‘गोविंदांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेमंड परिसरातही दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे. युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांसोबत मराठी आणि हिंदी लोकनृत्यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच नवयुग मित्र मंडळाच्या वतीने ठाणे जिल्हा सैनिक फेडरेशनमधील निवृत्त सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
टेंभी नाक्याच्या मानाच्या हंडीचे आकर्षण
धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाशी जोडलेली टेंभी नाक्याची दहीहंडी ठाण्यातील मानाच्या हंड्यांपैकी एक मानली जाते. यंदाही या ठिकाणी गोविंदा पथकांच्या थरारासोबत नामवंत गायक आणि कलाकारांच्या नृत्य-संगीताचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच मालिकांमधील कलाकारांची उपस्थिती आणि महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडविणारा लावणीचा कार्यक्रम हे यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
कामगार नाक्यावर संगीताची मेजवानी
वागळे इस्टेटमधील कामगार नाका, रोड क्रमांक २३ येथे एकनाथ भोईर फाऊंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास गायिका वैशाली सामंत, गायक रोहित राऊत, निवेदक स्वप्नील जाधव आणि गायिका अमृता दहिवेलकर यांची उपस्थिती राहणार आहे.
ढोल-ताशांचा गजर, मानवी मनोऱ्यांचा थरार
ठाण्यातील प्रमुख दहीहंड्यांबरोबरच शहरातील विविध भागांत छोट्या-मोठ्या दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभर शहरात गोविंदा पथकांची लगबग आणि सराव सुरू राहणार असून, उत्सवाच्या दिवशी ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा आला रे’च्या घोषणा आणि उंचच उंच मानवी मनोरे यामुळे ठाणे शहर दुमदुमणार आहे.
यंदाच्या दहीहंडीमध्ये परंपरा, साहस, विक्रम आणि मनोरंजनाचा संगम पाहायला मिळणार असल्याने ठाणेकरांसाठी हा उत्सव विशेष ठरण्याची चिन्हे आहेत. मात्र, मानवी मनोरे रचताना गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

