पुणे प्रतिनिधी
पुणे : शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यास सांगितल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी महाविद्यालयात प्रवेश करणे तसेच प्राचार्यांना धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याला राजकीय वादाचे स्वरूप आले आहे.
अमित ठाकरे सोमवारी पुणे दौर्यावर आले असून, या दौऱ्यात ते शहरातील सात महाविद्यालयांना भेटी देऊन जेन-झी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत वसतिगृह, खानावळ आणि स्वच्छतागृहांची पाहणी केली.
दरम्यान, महाविद्यालयातील एका कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यानंतर अमित ठाकरे यांनी मोदींच्या फोटोबाबत नाराजी व्यक्त करत तो हटवण्याच्या सूचना मनसे कार्यकर्त्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर एका कार्यकर्त्याने कार्यालयाच्या भिंतीवरील मोदींचा फोटो खाली उतरवला.
फोटो हटवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर या घटनेवरून राजकीय वातावरण तापले. भाजपकडूनही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, अमित ठाकरे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवरून प्रशासनाला जाब विचारला. वसतिगृहाची खराब अवस्था, अस्वच्छ स्वच्छतागृहे, खानावळीतील निकृष्ट दर्जाचे जेवण तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह अन्य सुविधांबाबत त्यांनी प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू झालेला त्यांचा पुणे दौरा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्याच्या प्रकरणामुळे पोलिस कारवाईपर्यंत पोहोचला आहे.

