सातारा प्रतिनिधी
सातारा : खासदार श्री. छत्रपती उदयनराजे भोसले, राजमाता श्री. छत्रपती कल्पनाराजे भोसले आणि श्री. छत्रपती वीरप्रतापसिंह उदयनराजे भोसले यांच्याबाबत फेसबुकवरील व्हिडीओवर आक्षेपार्ह व बदनामीकारक कमेंट केल्याप्रकरणी आठ फेसबुक अकाउंटधारकांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय कृष्णा गाढवे (वय ६६, रा. कृष्णानगर, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. २६ ऑगस्ट रोजी फेसबुकवरील ‘व्हिसीन मराठी’ या न्यूज चॅनलच्या अकाउंटवर खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला होता. या व्हिडीओवर संबंधित व्यक्तींनी आक्षेपार्ह कमेंट केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या कमेंटमुळे विविध समाजघटकांत द्वेष व सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण करून शांतता भंग करण्याचा तसेच संबंधित व्यक्तींची सामाजिक प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी आशीर्वाद चव्हाण, बाळासाहेब नलघे, उल्हास चौलकर, विजय सागर, प्रदीप जगताप, गुलाबराव सरकटे, रणजीता चव्हाण आणि किरण चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे करीत आहेत.

