कल्याण प्रतिनिधी
रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या ‘फटका गँग’चा धुमाकूळ पुन्हा एकदा समोर आला आहे. आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ राज्यराणी एक्स्प्रेसच्या दरवाजात उभ्या असलेल्या तरुणाच्या हातावर काठीने जोरदार फटका मारून त्याच्या हातातील मोबाईल खाली पाडण्यात आला. रुळालगत दबा धरून बसलेल्या साथीदारांनी क्षणार्धात मोबाईल उचलून पलायन केले.
सिन्नर तालुक्यातील परमानंद आव्हाड (२१) हा तरुण राज्यराणी एक्स्प्रेसने प्रवास करीत होता. कल्याण स्थानकात उतरण्यासाठी तो टिटवाळा स्थानक ओलांडल्यानंतर दरवाजाजवळ उभा राहिला. ट्रेन आंबिवली स्थानकाजवळ पोहोचताच तिचा वेग कमी झाला. याच संधीचा फायदा घेत रेल्वे उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या तीन जणांपैकी एकाने परमानंदच्या हातावर काठीने जोरदार प्रहार केला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्याच्या हातातील मोबाईल खाली पडला. रुळांलगत आधीच दबा धरून बसलेल्या साथीदारांनी तो मोबाईल उचलला आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
दरवाजात उभे राहणे असो किंवा प्रवाशांच्या हातातील मोबाईल हेरणे, रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या अशा घटनांमुळे रेल्वे पोलिसांच्या गस्तीसह स्थानक परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

