ठाणे प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर आपल्या कार्याची ठसठशीत छाप उमटविणारे धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्या कार्याची आणि सामाजिक योगदानाची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी ठाण्यात मंगळवारी (२५ ऑगस्ट) ‘आनंद चित्रकथा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारटक्के फाऊंडेशन, येवनेट मल्टिमीडिया प्रा. लि. आणि विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत दोन सत्रांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी परीक्षकांनी निवडलेल्या उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख केवळ राजकीय किंवा सामाजिक संदर्भात न राहता ती विद्यार्थ्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीतून पुढे यावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी राज्यातील शासकीय, महापालिका, खासगी तसेच अन्य शाळांमधील केजीपासून महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात राहणार आहे. कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे.
चित्रकलेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचे कार्य आणि विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या सामाजिक कार्यातील विविध पैलू, सामान्य नागरिकांशी असलेले त्यांचे नाते, समाजासाठी केलेले कार्य आणि त्यातून निर्माण झालेली प्रेरणा विद्यार्थ्यांच्या चित्रांमधून मांडली जाणार आहे. त्यामुळे ‘आनंद चित्रकथा’ हा केवळ चित्रकला स्पर्धेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या कलात्मक जाणिवेला आणि सामाजिक भानाला चालना देणारा उपक्रम ठरण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
मान्यवरांचा पुरस्काराने गौरव
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कला आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शंकर देसाई आणि अप्पा तथा चंद्रशेखर त्र्यंबक महाशब्दे यांना ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच किशोर नादावडेकर आणि प्रशांत सकपाळ यांना ‘धर्मवीर आनंद दिघे विशेष योगदान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, पनवेलचे महापौर नितीन पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. ‘आनंद चित्रकथा’मध्ये नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठाण्याचे नगरसेवक तथा बारटक्के फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप बारटक्के यांनी केले आहे.

