नंदुरबार : प्रतिनिधी
विकासाच्या मोठमोठ्या घोषणा आणि योजनांचा गजर सुरू असतानाही सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील नागरिकांचे वास्तव आजही भयावह असल्याचे नंदुरबार जिल्ह्यातील एका हृदयद्रावक घटनेतून पुन्हा समोर आले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी येथील बारीपाडा गावात रस्ता आणि नदीवर पूल नसल्याने २३ वर्षीय विवाहितेला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. बांबू आणि चादरीची झोळी करून तिला रुग्णालयात नेले जात असतानाच वाटेत तिचा मृत्यू झाला. या घटनेने प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सातपुड्यातील मूलभूत सुविधांच्या दुरवस्थेबाबत संताप व्यक्त होत आहे.
वेहगीच्या बारीपाडा येथील रुसाबाई सुभाष वळवी (वय २३) यांना शुक्रवारी सायंकाळी अचानक छातीत आणि पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. काही वेळातच त्यांची प्रकृती गंभीर बनली. मात्र गावात पक्का रस्ता नसल्याने रुग्णवाहिका थेट घरापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यातच सुक नदीवर पूल नसल्याने उपचारासाठी जाणेही अत्यंत कठीण झाले.
अखेर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बांबू व चादरीच्या साहाय्याने झोळी तयार करून रुसाबाईंना त्यात ठेवले आणि पिंपळखुंटा येथील रुग्णालयाच्या दिशेने पायपीट सुरू केली. मात्र दुर्गम वाटा आणि नदी पार करताना मौल्यवान वेळ निघून गेला. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रुसाबाईंची प्राणज्योत मालवली. वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचला असता, अशी हळहळ ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
रुसाबाई यांचे माहेर वेहगी बारीपाडा येथे असून त्यांचे सासर ओहवा येथे आहे. दोन दिवसांपूर्वीच त्या पतीसोबत माहेरी आल्या होत्या. त्यांना सात महिन्यांचे बाळ असल्याची माहिती असून, त्यांच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, सातपुड्यातील अनेक दुर्गम गावे आजही सर्वकालीन रस्ते, पूल, फरशी आणि साकव अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पावसाळ्यात ही गावे बाहेरील जगापासून तुटून पडतात. अत्यवस्थ रुग्ण, गर्भवती माता, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदी-नाले ओलांडावे लागतात. एका तरुण विवाहितेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यानंतरही या गावांचा प्रश्न केवळ आश्वासनांपुरताच राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
आंदोलनकर्त्यांवर गुन्हे; प्रश्न मात्र कायम
वेहगी येथील ग्रामस्थ दिलीप जयसिंग पाडवी यांनी सांगितले की, रस्ता आणि पुलाच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. मात्र प्रश्न सोडविण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सुमारे दोन हजारांहून अधिक ग्रामस्थ आजही रस्ता आणि पूल नसल्याने हाल सोसत आहेत. अत्यवस्थ रुग्ण, गर्भवती माता आणि विद्यार्थ्यांची रोजची परीक्षा थांबविण्यासाठी शासनाने तातडीने रस्ता व पुलाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“सुविधा मागणे हा आमचा अधिकार नाही का? रस्ता आणि पुलाअभावी आणखी किती जीव जाणार? शासन आणि प्रशासनाने आता तरी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे,” अशी आर्त मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

