मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशावर आता अतिरिक्त भार पडणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. नव्या दरानुसार रिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये, तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये होणार आहे. हे दर पहिल्या १.५ किलोमीटर अंतरासाठी लागू राहणार आहेत.
अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरटीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाडेवाढीची अधिसूचना जारी झाल्यानंतर पुढील काही आठवड्यांत मुंबईसह महानगर प्रदेशात हे नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.
सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती तसेच वाहनांच्या देखभाल व परिचालन खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन भाडेवाढ करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून गेल्या काही महिन्यांपासून भाडेवाढीची मागणी करण्यात येत होती. मे महिन्यात महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीचा दर ८६ रुपये प्रति किलो केल्यानंतर मुंबई रिक्षा मेन्स युनियनने प्रति किलोमीटर १.१२ रुपयांची वाढ करण्याची मागणी केली होती.
२०१७ मध्ये बी. सी. खटुआ समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे ही भाडेवाढ करण्यात आली आहे. इंधनाचे दर, वाहनांचा खर्च, कर्जावरील व्याजदर, ग्राहक किंमत निर्देशांक आणि सरकारी कर आदी निकषांचा विचार करून भाडे निश्चित करण्याची शिफारस समितीने केली होती. यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी ऑक्टोबर २०२२ आणि मार्च २०२१ मध्येही भाडेवाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागणार असल्याने मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाच्या खर्चात वाढ होणार आहे.

