
मुंबई प्रतिनिधी
जगातील सर्वात कोस्टल रोड आपल्या महाराष्ट्रात होणार आहे. या कोस्टलचे रोड काम प्रगतीपथावर असून महाराष्ट्राचा हा कोस्टल रोड चीनचा रेकॉर्ड मोडणार आहे.
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत तयार करण्यात येत असलेल्या या कोस्टल रोडमुळे नरीमन पॉईंट ते विरार प्रवास फक्त 40 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली जाणार आहे.
मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक जोणाऱ्या पुलाचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. या पुलामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता 15 मिनिटांत होत आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन येथून थेट एन्ट्री देण्यात आली आहे. याच मार्गाचा विस्तार विरारपर्यंत केला जाणार आहे.
मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंक हा महाराष्ट्रातील पहिला सी लिंक आहे. आता महाराष्ट्रात वांद्रे ते वर्सोवादरम्यान दुसरा मोठा सी लिंक उभारला जात आहे. कोस्टल रोडचा दहिसरपर्यंत विस्तार केला जाणार आहे. भविष्यात कोस्टल रोडचा विस्तार भाईंदर, विरार आणि पालघरपर्यंत केला जाणार आहे.
वांद्रे वर्सोवा सी लिंक हा स्वातंत्र्य वीर सावरकर सेतू नावाने ओळखला जातोय. या प्रकल्पाचे 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. मे 2028 पर्यंत हा प्रक्लप पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. हा सी लिंक तयार झाल्यावर वांद्रे ते वर्सोवा हे अंतर अवघ्या 10 मिनिटांत पार करता येणार आहे. तर, भविष्यात हा सी लिंक वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. यामुळे मरीन ड्राइव्ह ते दहिसर हा दीड तासांचा प्रवास फक्त 45 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. वांद्रे वर्सोवा सागरी सेतू हा मुंबईतील दुसरा सागरी सेतू आहे. तिथूनच पुढे वर्सोवावरुन विरारपर्यंत कोस्टल रोडचा विस्तार करण्याची योजना आहे.