स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : चारकोप इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका कारखान्यात १३ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांकडून काम करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चारकोप पोलिसांच्या एटीसी पथकाने १८ ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईत तब्बल १३ बालकामगारांची सुटका केली. या मुलांकडून कष्टाची कामे करून घेत त्यांची पिळवणूक केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
चारकोप इंडस्ट्रियल इस्टेटमधील अलंकीत क्रिएशन्स एलएलपी, जाहरा फॅशन एरा या कारखान्यावर पोलिसांनी विशेष मोहिमेंतर्गत कारवाई केली. कारखान्यात अल्पवयीन मुलांना कामावर ठेवण्यात आल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी १३ मुलांची सुटका केली. सुटका करण्यात आलेली सर्व मुले पश्चिम बंगालमधील विविध जिल्ह्यांतील रहिवासी असून, त्यांचे वय अंदाजे १३ ते १७ वर्षे आहे.
या प्रकरणी कारखान्याचा मालक अंकित कुमार महेंद्र रावल (३६, रा. चिराबाजार, मुंबई) आणि चालक सामीनूर मोती आर. रहमान शेख (३४, रा. कांदिवली पश्चिम, मुंबई) यांच्याविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ मधील कलम ७५ आणि ७९ तसेच बालकामगार (प्रतिबंध आणि विनियमन) अधिनियम १९८६ मधील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
सुटका करण्यात आलेल्या बालकामगारांना पोलिसांनी ताब्यात घेत पुढील कायदेशीर तसेच संरक्षणात्मक कार्यवाही सुरू केली आहे. अल्पवयीन मुलांना कारखान्यात कामावर ठेवण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास चारकोप पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मिना, उत्तर परिमंडळ-२चे पोलीस उपायुक्त संदिप घुगे, मालवणी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त महेशकुमार ठाकूर आणि चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकाळजे तसेच पोलीस अंमलदार मनिषा क-हे, संतोष तरडे, संजय पाटील आणि सतीश पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला. बालकामगारांचा वापर करून त्यांची पिळवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

