मुंबई प्रतिनिधी
मुंबई : रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्यात आले असून, या नियमाची अंमलबजावणी आज गुरुवारपासून करण्यात येणार आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम एक महिन्याची मुदत दिली जाईल. या कालावधीत मराठीचे ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅज तीन महिन्यांपर्यंत निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅज आणि परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
बुधवारी पत्रकार परिषदेत सरनाईक यांनी या नियमाच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. राज्यातील रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने १०५ दिवसांपासून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ राबविण्यात आले. या अभियानाला एक लाख ६५ हजार ६०० अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांनी प्रतिसाद देत मराठीचे प्रशिक्षण घेतले आहे.
१२ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. ‘मी मराठी शिकणार नाही, बोलणार नाही,’ अशी भूमिका घेणाऱ्या चालकांविरोधात कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
नवीन बॅजसाठी भाषेची चाचणी
राज्यात आतापर्यंत सुमारे नऊ लाख ६५ हजार रिक्षा-टॅक्सी परवाने आणि बॅज देण्यात आले आहेत. यापुढे नवीन परवाना किंवा बॅज देताना चालकाला व्यावहारिक मराठीचे ज्ञान आहे की नाही, याची आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे तपासणी करणार आहेत. या तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले जाणार आहे. चालकाला व्यावहारिक मराठीचे ज्ञान असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच बॅज देण्यात येईल.
अधिवास प्रमाणपत्रांचीही तपासणी
रिक्षा-टॅक्सीचा परवाना किंवा बॅज मिळवण्यासाठी बनावट अधिवास प्रमाणपत्रांचा वापर होत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अधिवास प्रमाणपत्रांची सखोल तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या तपासणीची जबाबदारी अतिरिक्त परिवहन आयुक्त रवि गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

