मुंबई प्रतिनिधी
मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयाची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बुधवारी सायंकाळी आकस्मिक पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, औषधांची उपलब्धता, स्वच्छता, रुग्णांना दिला जाणारा आहार तसेच विविध विभागांतील व्यवस्थेचा आढावा घेत महापौरांनी रुग्णालय प्रशासनाला विविध सूचना केल्या.

महापौरांनी सर्वप्रथम महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या नोंदणी कक्षाची पाहणी केली. हा कक्ष केवळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत न ठेवता २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच आयुष्मान कार्डधारक रुग्णांकडे इतर कागदपत्रांची सक्ती करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली.
यानंतर महापौरांनी अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, बाल रुग्ण विभाग, महिला व पुरुष वैद्यकीय विभागांची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला. डॉक्टर व परिचारिकांकडून मिळणारी सेवा, औषधांची उपलब्धता, स्वच्छता आणि आहाराबाबत त्यांनी रुग्णांकडून थेट माहिती घेतली. रुग्णांसाठी देण्यात आलेल्या आहाराची गुणवत्ता महापौरांनी स्वतः तपासली. आहाराचा दर्जा तातडीने सुधारण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
रुग्णालयातील सर्व विभागांमध्ये स्वच्छता राखावी, रुग्णांशी आपुलकीने संवाद साधावा आणि त्यांना आवश्यक औषधे वेळेवर उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देशही महापौरांनी दिले. रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ, आरोग्य सुविधा आणि इतर गरजांची माहिती प्रशासनाने द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
महापौरांनी दुसऱ्या मजल्यावरील डीएसए कॅथलॅबची पाहणी करून मज्जातंतू शस्त्रक्रिया विभागातील अत्याधुनिक यंत्रणा व सुविधांचा आढावा घेतला. या विभागासाठी पूर्णवेळ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या व समस्यांबाबत महापौरांना निवेदन दिले. कंत्राटी कर्मचारी तसेच कंत्राटी डॉक्टरांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.
या पाहणीवेळी अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निरंजन क्षीरसागर यांच्यासह संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय सहाय्यक कर्मचारी उपस्थित होते.

