पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. ‘चल, तुला सायकल शिकवतो’, असे सांगून आरोपीने चिमुरडीला घरापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील निर्मनुष्य ठिकाणी नेले. तेथे घनदाट उसाच्या शेतात तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा, तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
चिमुरडीला सायकल शिकण्याची इच्छा असल्याची माहिती आरोपीला होती. त्याचाच फायदा घेत ‘तुला सायकल शिकवतो’, असे सांगून तो तिला घरापासून दूर घेऊन गेला. मुख्य रस्त्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर आत असलेल्या घनदाट शेतीच्या परिसरात त्याने तिला नेले. एका बाजूला उसाचे दाट पीक, तर दुसऱ्या बाजूला ओढा आणि आजूबाजूला निर्मनुष्य परिसर असल्याने हा भाग अत्यंत एकांताचा आहे.
या परिसरातील शेतमालकही नियमितपणे शेतात येत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आरोपीने या ठिकाणाचा गैरफायदा घेतल्याचा संशय आहे. चिमुरडीला अशा निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
घटनास्थळ पाहून अंगावर काटा
या घटनेचे घटनास्थळ समोर आल्यानंतर तेथील परिस्थिती पाहून अंगावर काटा येतो. दाट उसाचे पीक, झाडाझुडपांनी वेढलेला परिसर आणि लगतचा ओढा यामुळे बाहेरून या ठिकाणी सहज कोणाचे लक्ष जाण्याची शक्यता कमी आहे. मुख्य रस्त्यापासूनही हे ठिकाण काही अंतरावर असल्याने आरोपीने जाणीवपूर्वक निर्मनुष्य जागेची निवड केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, घटनेचा तपास वेगाने सुरू आहे. तपास यंत्रणांकडून घटनास्थळाची पाहणी, पुरावे संकलन आणि संबंधितांची चौकशी केली जात आहे.
संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
या अमानुष घटनेनंतर पिंपळवंडी परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी आणि चिमुरडीला न्याय मिळावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
‘चिमुरडीच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपीला कोणतीही दया दाखवू नये,’ अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या प्रकरणाचा खटला जलदगतीने चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशीही मागणी होत आहे.
सुनेत्रा पवारांकडून पोलिस अधीक्षकांशी चर्चा
घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक आणि सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलिस प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
ही घटना अत्यंत दुर्दैवी, धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे सांगत पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची मागणी
आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी, यासाठी या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची विशेष विनंती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, आपण लवकरच पिंपळवंडी येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
परिसरात संतापाची लाट
दरम्यान, या घटनेने जुन्नर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईसोबतच समाजानेही अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील नेमके तथ्य आणि आरोपीविरुद्धचे पुरावे स्पष्ट होतील. मात्र, सध्या पिंपळवंडीतील नागरिकांची एकच मागणी आहे. चिमुरडीला न्याय मिळावा आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी.

