कल्याण प्रतिनिधी
कल्याण : ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणातील मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी स्थानिक भूमिपुत्रांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) तब्बल १३८.४५ कोटी रुपयांचा मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला असून, रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.
कल्याण-शिळफाटा मार्गाचे सहापदरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र, संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्रांनी कामाला विरोध केला होता. त्यामुळे काटई नाका, पलावा चौक आणि शिळफाटा परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली होती.
या प्रश्नासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मंगळवारी मुंबई येथे एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते भूमिपुत्रांना मोबदल्याची पत्रे वितरित करण्यात आली.
या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, मनसेचे माजी आमदार राजू पाटील, महापौर हर्षदा चौधरी, गोपाळ लांडगे यांच्यासह जमीनमालक उपस्थित होते.
मोबदल्याचा प्रश्न निकाली निघाल्याने रस्ता रुंदीकरणाचे रखडलेले काम वेगाने पुढे जाण्याची अपेक्षा आहे. या कामामुळे लाखो वाहनचालकांना दिलासा मिळण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्याची शक्यता आहे. तसेच मेट्रो १२ आणि मेट्रो १२ अ या मार्गांच्या कामालाही यामुळे गती मिळण्याची शक्यता असून, उर्वरित मोबदल्याचे वाटपही लवकरच करण्यात येणार आहे.

