सातारा प्रतिनिधी
सातारा : दृष्टी नसली तरी दूरदृष्टीच्या जोरावर शंभर टक्के अंधत्वावर मात करत सातारच्या सुजित रमाकांत शिंदे यांनी महाराष्ट्रातील पहिले १०० टक्के अंध शिक्षणाधिकारी होण्याचा मान मिळविला आहे. सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला असून, त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाने संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानास्पद कामगिरी नोंदवली आहे.
मूळच्या सातारच्या असलेल्या सुजित शिंदे यांनी उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला रेल्वेत तब्बल नऊ वर्षे सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी युनियन बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून सात वर्षे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. एकूण १६ वर्षांची स्थिर नोकरी केल्यानंतरही त्यांच्या मनातील क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न आणि जिद्द कायम होती. अखेर २०२२ मधील एमपीएससीच्या जाहिरातीनंतर त्यांनी पुन्हा एकदा अभ्यासाचे कठीण व्रत हाती घेतले.
दृष्टी नसतानाही त्यांनी हार मानली नाही. या खडतर संघर्षात त्यांच्या पत्नीची साथ अत्यंत मोलाची ठरली. पत्नीने तासनतास पुस्तके मोठ्याने वाचून दाखवत त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले आणि सुजित यांनी ते रात्रंदिवस ऐकत अभ्यासाची तयारी केली. त्यांच्या या अथक परिश्रमाला २०२५ मध्ये यश मिळाले आणि ते एमपीएससी परीक्षेत यशस्वी ठरले. सातारा येथे एक वर्ष परिविक्षाधीन गटशिक्षणाधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर आता त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
सुजित शिंदे यांच्या कामकाजात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. कार्यालयीन कागदपत्रे वाचण्यासाठी त्यांना विशेष ‘पेपर वाचणारे मशीन’ उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना सुजित शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “माझ्या डोळ्यांत प्रकाश नसला, तरी राज्यातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात राहू देणार नाही. प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून, शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि शासकीय योजना तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचवणे हेच माझे मुख्य ध्येय असेल,” असा दृढ संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखविला. स्वतःच्या आयुष्यातील अंधारावर मात करत हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या सुजित शिंदे यांच्या या प्रवासाने संपूर्ण राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

