पुणे प्रतिनिधी
पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी सण, सामाजिक व राजकीय कार्यक्रम तसेच विविध आंदोलने आणि मोर्चांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आज, १८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुढील १४ दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध असणार आहेत.
पुणे पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या आदेशानुसार, १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) डॉ. प्रशांत अमृतकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत.
पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यावर निर्बंध
या आदेशामुळे पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे. मोर्चे, रॅली, आंदोलने, निदर्शने, मिरवणुका किंवा अन्य सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी संबंधित पोलीस विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असेल.
विनापरवानगी गर्दी करणे किंवा प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणे महागात पडू शकते. अशा प्रकारच्या उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १३५ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
शस्त्रे, दगड, ज्वलनशील पदार्थांवरही बंदी
प्रतिबंधात्मक आदेशाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, स्फोटक पदार्थ तसेच ज्वलनशील पदार्थ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुतळे जाळणे, चिथावणीखोर घोषणाबाजी करणे किंवा सामाजिक सलोखा आणि शांतता भंग होईल, अशा कोणत्याही प्रकारच्या कृतींनाही प्रतिबंध करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या कृतींना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
आंदोलने, मोर्चे आणि मिरवणुकांवर पोलिसांची नजर
गेल्या काही महिन्यांत पुणे शहरातील विविध भागांत घडलेल्या घटना, आंदोलने, सामाजिक व राजकीय कार्यक्रम तसेच आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. विविध संघटनांकडून मोर्चे, निदर्शने किंवा आंदोलने आयोजित केली जातात. तसेच अतिक्रमण हटावाच्या कारवायांदरम्यानही गर्दी होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
कोणाला मिळणार सूट?
कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांना या आदेशातून आवश्यक ती सूट देण्यात आली आहे. तसेच ३.५ फुटांपर्यंतची काठी बाळगणाऱ्या सुरक्षारक्षकांनाही नियमानुसार सूट देण्यात आली आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
दरम्यान, पुणे पोलिसांनी नागरिकांनी प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, मोर्चे किंवा अन्य उपक्रम आयोजित करण्यापूर्वी संबंधित पोलीस विभागाची आवश्यक परवानगी घ्यावी. विनापरवानगी गर्दी करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे पुढील १४ दिवस पुणे शहरात सार्वजनिक कार्यक्रम, आंदोलने आणि मोर्चांच्या आयोजनावर पोलिसांची विशेष नजर राहणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

