पिंपरी प्रतिनिधी
दावोस येथे झालेल्या गुंतवणूक करारांचे काय झाले, किती कंपन्यांनी प्रत्यक्ष गुंतवणूक केली आणि राज्यात किती गुंतवणूक आली, याचा लेखाजोखा मांडणारी ‘भगवी श्वेतपत्रिका’ काढण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू असून, वेदांता-फॉक्सकॉन आणि एअरबस प्रकल्पाबाबत यापूर्वी श्वेतपत्रिका काढण्यात आली होती; मात्र त्यावर कोणीही चर्चा केली नाही, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.
चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक, रस्ते, वाहनतळ, पाणी आणि आरोग्य सुविधांच्या प्रश्नांचा रविवारी उद्योगमंत्री सामंत यांनी पाहणी करून आढावा घेतला. एमआयडीसी, पीएमआरडीए, उद्योजक आणि उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चाकण एमआयडीसीतील मोकळी जागा वाहनतळासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या कंपन्यांकडे ३०० एकर जागा आहे, त्यांनी आपल्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी. महामार्गालगत वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सामंत यांनी दिला. पर्यायी मार्ग उभारण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना आवश्यक अधिकार देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांचा ‘दरबार’
चाकण परिसरातील प्रश्न केवळ बैठका घेऊन प्रलंबित ठेवले जाणार नाहीत. दर शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी ‘दरबार’ घेऊन स्थानिक समस्या आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतील. शक्य ते प्रश्न त्याच वेळी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच उद्योगमंत्री स्वतः दर दोन महिन्यांनी आढावा बैठक घेणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
अत्याधुनिक रुग्णालय, ट्रक टर्मिनल
एमआयडीसीतील प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधित विभागांकडून काम करून घेण्याचे तसेच वेळेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार समितीला देण्यात आले आहेत.
चाकणमध्ये ट्रक टर्मिनल उभारण्यात येणार असून, रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याची कार्यवाही केली जाईल. जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असून, लवकरच पाणीपुरवठा मंत्र्यांची बैठक होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
१८ किलोमीटरचा रस्ता पूर्ण करणार
चाकणच्या उद्योजकांना न्याय देऊन त्यांच्या मनातील संभ्रम दूर केला जाईल. तीन प्रमुख रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडीच्या समस्येला काही प्रमाणात आळा बसेल. सुमारे १८ किलोमीटर मार्गिकेचे काम अद्याप शिल्लक असून ते पूर्ण करण्यात येईल. कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही सामंत यांनी दिला.
चाकणच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल न करता सर्वांनी एकत्र येऊन उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. निवडणुकीच्या काळात टीका-टिप्पणी करण्यास वेळ आहे, असेही सामंत यांनी सुनावले.
पाच वर्षांत ३६ हजार २११ कंपन्यांना टाळे
राज्यात गेल्या पाच वर्षांत ३६ हजार २११ कंपन्या बंद झाल्या आहेत. यामध्ये कृषी, पर्यटन, खाणकाम, उत्पादन, जागा खरेदी-विक्री आणि बांधकाम व्यवसायातील कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी २०१३ च्या कंपनी कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण केली नसल्यामुळे त्या बंद झाल्या असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.
दरम्यान, दावोस गुंतवणूक करारांपासून राज्यातील बंद पडलेल्या कंपन्यांपर्यंतचा संपूर्ण लेखाजोखा जनतेसमोर आणण्यासाठी ‘भगवी श्वेतपत्रिका’ काढण्याची घोषणा सामंत यांनी केल्याने उद्योग क्षेत्रातील आकडेवारीवरून राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे.

