मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प असून, नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळी भागात पाणी पोहोचवून हा संकल्प पूर्ण करणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. विकसित भारताच्या उभारणीत महाराष्ट्राची भूमिका निर्णायक असून, राज्य देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील सेनानी, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन केले आणि राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
संविधानाने नागरिकांना अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्याचे भान ठेवून तिरंगा सदैव उंच राहील, असा संकल्प करण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्राचा विकासदर ८.८ टक्के
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या बारा वर्षांत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा गाठला असून, २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले आहे, असे फडणवीस म्हणाले. विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर दीन-दलित, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर आणि महिलांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य असून, चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत राज्याचा आर्थिक विकासदर जवळपास ८.८ टक्के राहिला आहे. प्रत्येक जिल्हा विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असून, आतापर्यंत सुमारे १३ जिल्ह्यांनी निर्धारित विकासाचे लक्ष्य पूर्ण केले आहे. गडचिरोली, पालघर, नंदुरबारसह राज्याच्या प्रत्येक भागात विकास पोहोचविण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी
शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राबविण्यात येत असून, ५६ लाख शेतकऱ्यांना तब्बल ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेनेही मोठी प्रगती झाली असून, सध्या ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. पुढील वर्षभरात राज्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
पुढच्या पिढीला दुष्काळ दिसू नये
महाराष्ट्राच्या मागील पिढ्यांनी दुष्काळाचे संकट अनुभवले; मात्र पुढील पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्यात येणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.
महिलांना शेतकरी म्हणून मान्यता
महिलांना शेतकऱ्याचा दर्जा देण्यासाठी ‘महिला शेतकरी कायदा’ करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. महिलांसह वंचित घटकांच्या विकासासाठी लक्षित योजना राबवून सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र ‘स्टार्टअप कॅपिटल’
राज्यातील युवकांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ‘एज्युसिटी’च्या माध्यमातून परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आणले जात आहे. राज्यातील विद्यापीठांचा दर्जा उंचावण्यासोबतच आधुनिक आणि ‘कटिंग-एज’ शिक्षण उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्र देशाचे ‘स्टार्टअप कॅपिटल’ बनले असून, राज्यात देशातील सर्वाधिक गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूक होत आहे. त्यामुळे युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
‘देशाच्या प्रगतीत आजही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि भविष्यातही देशाच्या प्रगतीचा सर्वात मोठा वाटेकरी महाराष्ट्र असेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकारी, सेनादलाचे अधिकारी आणि निमंत्रित नागरिकांची भेट घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी, मंत्रालयीन विभागांचे प्रमुख, तिन्ही सेनादलांचे अधिकारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि निमंत्रित नागरिक उपस्थित होते.

