नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे ध्येय समोर ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘सप्तधारा’ अर्थात विकासाचे सात शक्तिशाली प्रवाह देशासमोर मांडले. उत्पादन, शेती, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, संरक्षण, हरित-नील अर्थव्यवस्था आणि भारताची जागतिक सॉफ्ट पॉवर या सात क्षेत्रांवर निर्णायक भर देत आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली भारत घडविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना मोदी यांनी मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी मोठे संकल्प करण्याचे आवाहन केले. गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा आढावा घेत त्यांनी आगामी काळातील विकासाची दिशा स्पष्ट केली.
“आज प्रत्येकाच्या हृदयाची स्पंदने ‘वंदे मातरम्’च्या शब्दांनी गुंजत आहेत. आज ‘हर घर तिरंगा’ आणि ‘हर मन तिरंगा’ आहे. देश नव्या उत्साहाने आणि नव्या संकल्पांसह पुढे जात आहे,” असे मोदी म्हणाले. स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना तसेच महात्मा गांधी आणि महान क्रांतिकारकांना त्यांनी आदरांजली अर्पण केली.
काय आहेत ‘सप्तधारा’चे सात प्रवाह?
१. उत्पादन क्षेत्रातील उत्कृष्टता :
उत्पादन क्षेत्रात खर्च कमी करणे, जागतिक दर्जाची गुणवत्ता राखणे आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढविणे यावर भर देण्यात येणार आहे. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचा यामागे उद्देश आहे.
२. शेती आणि अन्नप्रक्रिया :
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देतानाच कृषी उत्पादनावर प्रक्रिया करून त्यातून अधिक मूल्य निर्माण करण्यावर भर राहणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
३. तंत्रज्ञान आणि नवोपक्रम :
कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून भारताला तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर नेण्याचे उद्दिष्ट मोदी यांनी मांडले. तरुणाईला या क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
४. गतिशक्ती आणि कनेक्टिव्हिटी :
रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ आणि डिजिटल पायाभूत सुविधांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी ‘गतिशक्ती’च्या माध्यमातून वेगवान विकास साधण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
५. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता :
देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक संरक्षण साहित्य आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीत स्वावलंबी होण्यावर भर दिला जाणार आहे. संरक्षण उत्पादनात भारताची क्षमता वाढवून निर्यातीलाही चालना देण्याचे उद्दिष्ट आहे.
६. हरित आणि नील अर्थव्यवस्था :
पर्यावरणपूरक विकासासोबतच समुद्रसंपत्ती आणि सागरी अर्थव्यवस्थेचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. हरित ऊर्जा, पर्यावरण संरक्षण आणि नील अर्थव्यवस्थेला विकासाचे नवे क्षेत्र म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न असेल.
७. भारताची जागतिक सॉफ्ट पॉवर :
योग, आयुर्वेद व आरोग्यसेवा, पर्यटन, संस्कृती, कला आणि सर्जनशील क्षेत्रांच्या माध्यमातून भारताची जागतिक ओळख अधिक प्रभावी करण्याचा संकल्प मोदी यांनी व्यक्त केला. भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याला आर्थिक विकासाशी जोडण्याचा प्रयत्न या प्रवाहातून केला जाणार आहे.
युवा शक्तीला केंद्रस्थानी स्थान
‘सप्तधारा’च्या माध्यमातून विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका निर्णायक असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. देशातील प्रतिभावान तरुणांना शोधून त्यांना योग्य प्रशिक्षण आणि संधी देण्यासाठी देशव्यापी प्रतिभा शोध मोहिमेची घोषणाही त्यांनी केली.
मोठी स्वप्ने, मोठे संकल्प आणि सात विकासप्रवाहांच्या माध्यमातून २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचा निर्धारच मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा केंद्रबिंदू ठरला.

