नवी दिल्ली, वृत्तसंस्था
देशाच्या संरक्षणासाठी आणि अंतर्गत सुरक्षेसाठी अदम्य शौर्य, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा दाखविणाऱ्या सैन्य दल तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवान आणि अधिकाऱ्यांचा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शौर्य पुरस्कार जाहीर करून गौरव केला. यंदा एकूण ७८ शौर्य पुरस्कारांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी १३ पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहेत.
या पुरस्कारांमध्ये नऊ किर्ती चक्र, १९ शौर्य चक्र, एक बार टू शौर्य चक्र, पाच बार टू सेना पदके, ३६ सेना पदके, तीन नौसेना पदके आणि पाच वायूसेना पदकांचा समावेश आहे. देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करताना तसेच दहशतवादविरोधी कारवायांमध्ये असामान्य धैर्य दाखविणाऱ्या अधिकारी आणि जवानांच्या कामगिरीची दखल या पुरस्कारांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
किर्ती चक्र, शौर्य चक्राने शूरवीरांचा सन्मान
शांततेच्या काळात दाखविलेल्या असामान्य शौर्यासाठी दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च पुरस्कारांमध्ये किर्ती चक्राचा समावेश होतो. अशोक चक्रानंतर किर्ती चक्र हा दुसऱ्या क्रमांकाचा तर शौर्य चक्र हा तिसऱ्या क्रमांकाचा शांततेच्या काळातील शौर्य पुरस्कार मानला जातो.
३६ राष्ट्रीय रायफल्सचे मेजर परमवीर, ५७ राष्ट्रीय रायफल्सचे मेजर तरुण वासुदेवन, १२ डोगरा रेजिमेंटचे मेजर केशव कुमार, २१ ग्रेनेडियर्सचे मेजर गौरव सिंग ब्रिजवाल, ११ राष्ट्रीय रायफल्सचे मेजर विपीन कुमार, ३ आसाम रायफल्सचे नायब सुभेदार शंकर राम, २१ पॅराचे नायब सुभेदार डब्बल सिंग बिश्त आणि ४ पॅराचे हवालदार जगत्तर सिंग यांच्यासह अनेक शूर जवान आणि अधिकाऱ्यांना शौर्य चक्राने गौरविण्यात येणार आहे.
याशिवाय ९ राष्ट्रीय रायफल्सचे लान्स नाईक नरेंद्र सिंधू यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर करण्यात आले आहे. ११ राष्ट्रीय रायफल्सचे लान्स नाईक कपिल देव, ७ शीख लाइट इन्फंट्रीचे शिपाई जसविंदर सिंग, नौदलाचे लेफ्टनंट कमांडर शिवम कुमार आणि हवाई दलाचे स्क्वाड्रन लीडर सुधीर कुमार यांचाही पुरस्कारप्राप्तांमध्ये समावेश आहे.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील डेप्युटी सुपरिटेंडंट धीरज सिंग कटोच, इन्स्पेक्टर अजय सिंग चिब, डेप्युटी सुपरिटेंडंट सुखवीर सिंग, असिस्टंट इन्स्पेक्टर नियाज अहमद, डेप्युटी कमांडंट अंजनी कुमार आणि कॉन्स्टेबल दीपक साह यांनाही शौर्य चक्र जाहीर झाले आहे.
आदित्य प्रताप सिंह यांना दुसऱ्यांदा शौर्य चक्र
४४ आसाम रायफल्सचे मेजर आदित्य प्रताप सिंह यांच्या शौर्याची विशेष दखल घेण्यात आली आहे. त्यांना दुसऱ्यांदा शौर्य चक्र प्रदान करण्यात येणार आहे. दहशतवादविरोधी आणि सुरक्षा कारवायांमध्ये उल्लेखनीय धैर्य दाखविल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
नऊ जणांना किर्ती चक्र
यंदा नऊ जणांना किर्ती चक्र जाहीर झाले आहे. २१ पॅराचे स्पेशल फोर्सेसचे लेफ्टनंट जनरल मनोज फ्रान्सिस आणि २ पॅराचे मेजर जितेंद्र राठी यांचा त्यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे, यापैकी सात जणांना मरणोत्तर किर्ती चक्र प्रदान करण्यात येणार आहे.
मरणोत्तर किर्ती चक्र मिळणाऱ्यांमध्ये २ पॅराचे हवालदार गजेंद्र सिंग, हेड कॉन्स्टेबल जगबीर सिंग, कॉन्स्टेबल जसवंत सिंग, कॉन्स्टेबल बलविंदर सिंग, कॉन्स्टेबल तारिक हुसेन, हेड कॉन्स्टेबल बशीर अहमद आणि इन्स्पेक्टर सुनील कुमार यांचा समावेश आहे.
कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान
देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असताना प्राणांची पर्वा न करता दहशतवाद्यांविरुद्ध आणि शत्रूविरोधी कारवायांमध्ये धैर्याने लढणाऱ्या जवानांच्या सर्वोच्च बलिदानाची यानिमित्ताने दखल घेण्यात आली आहे. मरणोत्तर पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांप्रती देशाची कृतज्ञता व्यक्त होत असून, शौर्य पुरस्कारप्राप्त जवान आणि अधिकाऱ्यांचा हा सन्मान देशाच्या संरक्षणासाठी समर्पित असलेल्या प्रत्येक जवानासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

