मुंबई प्रतिनिधी
विदर्भातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारी घडामोड समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह तब्बल १९ नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन या निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे दर्यापूरसह संपूर्ण विदर्भातील स्थानिक राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशात अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष तसेच कर्नाटकातील बेळगाव येथील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या सामूहिक पक्षप्रवेशाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दर्यापूरमध्ये काँग्रेसला धक्का
दर्यापूर नगर परिषदेत काँग्रेसचे नगराध्यक्षपद आणि १९ नगरसेवक शिवसेनेच्या गोटात गेल्याने काँग्रेसला स्थानिक पातळीवर मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाकडे विशेष लक्ष लागले आहे. या घडामोडीमुळे दर्यापूरच्या राजकारणात शिवसेनेचे संघटनात्मक बळ वाढण्याबरोबरच आगामी निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
प्रवेश सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले. दर्यापूरच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी महायुती सरकारकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘विकासाच्या राजकारणाला साथ’
यावेळी शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या कार्याचे कौतुक केले. विदर्भातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी कडू यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांतील कार्यकर्ते शिवसेनेत येत असल्याने ही बाब जनतेचा विश्वास आणि विकासाच्या राजकारणाला मिळणारी साथ दर्शवित असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
महाराष्ट्र हे दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य असल्याचा उल्लेख करत, गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हे महायुती सरकारचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले. विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला शिवसेनेत सन्मानाचे स्थान दिले जाईल, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.
विदर्भात संघटनवाढीवर भर
दर्यापूरमधील सामूहिक प्रवेशासोबतच विदर्भ आणि कर्नाटकातील विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शाखाप्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी झाले. त्यामुळे शिवसेनेने विदर्भात संघटनात्मक विस्ताराला वेग दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. नगर परिषद पातळीवर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांचा मोठ्या संख्येने झालेला प्रवेश हा काँग्रेससाठी धोक्याचा इशारा मानला जात असून, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
बच्चू कडूंच्या नेतृत्वाला बळ
या संपूर्ण पक्षप्रवेशामागे आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. विदर्भात संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या प्रयत्नांना या सामूहिक प्रवेशामुळे बळ मिळाल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.
प्रवेश सोहळ्यास आमदार प्रा. मनीषा कायंदे, अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे यांच्यासह विदर्भ व कर्नाटकातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दर्यापूर नगर परिषदेत काँग्रेसच्या नगराध्यक्षा आणि १९ नगरसेवकांचा शिवसेनेत झालेला प्रवेश हा केवळ पक्षबदल न राहता आगामी स्थानिक राजकारणातील संभाव्य सत्तासमीकरणांची नांदी ठरणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

