मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात नेतृत्वाच्या पातळीवर बदलांची प्रक्रिया सुरू असतानाच आता मुंबईतील पक्ष संघटनेतही मोठ्या फेरबदलाच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी माजी काँग्रेस आमदार तथा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य झिशान सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मुंबई महापालिका आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईतील संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. शहराध्यक्षपदासाठीच्या निवडीच्या प्रक्रियेत पार्थ पवार लक्ष घालत असल्याची चर्चा असून, त्यामुळे झिशान सिद्दीकी यांच्या नावाला पसंती मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पार्थ पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघटनात्मक फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांचा पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतील वाढता सहभाग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहराची पक्ष संघटनेची धुरा कोणाकडे सोपवायची, याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
झिशान सिद्दीकी यांना मुंबईची जबाबदारी दिल्यास त्यांच्यासमोर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याबरोबरच आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्याचे मोठे आव्हान असेल. त्यामुळे त्यांच्या संभाव्य नियुक्तीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह इतर राजकीय पक्षांचेही लक्ष लागले आहे.
कोण आहेत झिशान सिद्दीकी?
झिशान सिद्दीकी हे दिवंगत काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर वांद्रे पूर्व मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर मुंबईतील राजकारणात त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली.
मात्र, २०२४ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. मे २०२६ पासून त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ सुरू झाला आहे.
विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नावांची चर्चा असतानाही पक्षाने झिशान सिद्दीकी यांच्यावर विश्वास दाखवला. आता मुंबई शहराध्यक्षपदासाठीही त्यांचे नाव चर्चेत आल्याने पक्षातील त्यांच्या राजकीय महत्त्वात वाढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
ठाण्यात अजित पवार गटाला धक्का
दरम्यान, मुंबईत संभाव्य संघटनात्मक फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच ठाण्यात अजित पवार गटाला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ठाणे शहर युवक अध्यक्ष वीरू वाघमारे यांनी पक्षाला रामराम ठोकत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
वाघमारे यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस हेमंत वाणी यांनीही अजित पवार गटाची साथ सोडली. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना अपेक्षित सन्मान आणि स्थान मिळत नसल्याचा आरोप करत दोघांनी पक्षांतर केल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईत शहराध्यक्षपदासाठी नव्या नावाची चर्चा आणि ठाण्यात पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर, या दोन्ही घडामोडींमुळे अजित पवार गटातील संघटनात्मक स्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आगामी काळात पक्षाच्या मुंबई आणि ठाणे विभागात आणखी कोणते बदल होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

