मुंबई प्रतिनिधी
राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया सुरू असतानाच तब्बल 1 कोटी 80 लाख 60 हजार 697 मतदारांचे गणना अर्ज अद्याप निवडणूक विभागाकडे पोहोचलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत या मतदारांची नावे दिसणार नाहीत, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, अर्ज न मिळाल्याने संबंधित मतदारांचा मतदानाचा हक्क कायमचा संपणार नसून, प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे-हरकतींच्या माध्यमातून नाव पुन्हा समाविष्ट करून घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत SIRच्या कामकाजाची सद्यस्थिती जाहीर केली. राज्यातील तब्बल साडेनऊ कोटींहून अधिक मतदारांच्या नोंदी तपासण्याचे काम सुरू असून, मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले असले तरी लाखो मतदारांच्या अर्जांची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.
9.78 कोटी मतदार; 1.80 कोटींचा ठावठिकाणा नाही!
राज्यात एकूण 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदार आहेत. त्यापैकी 9 कोटी 69 लाख 54 हजार 766 मतदारांना गणना अर्ज वितरित करण्यात आले. यापैकी 7 कोटी 60 लाख 98 हजार 153 अर्ज प्राप्त झाले असून त्यांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
याशिवाय 36 लाख 95 हजार 199 अर्ज प्राप्त झाले असले तरी त्यांचे डिजिटायझेशन अद्याप बाकी आहे. मात्र, तब्बल 1 कोटी 80 लाख 60 हजार 697 मतदारांचे गणना अर्जच निवडणूक यंत्रणेकडे आलेले नाहीत.
गैरहजर मतदार, स्थलांतरित झालेले नागरिक, मृत मतदार तसेच मतदार यादीतील दुबार नोंदी यामुळे अर्ज प्राप्त झाले नसण्याची शक्यता निवडणूक विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे अर्ज न मिळालेल्या प्रत्येक मतदाराला मृत, स्थलांतरित किंवा दुबार मतदार समजले जाणार नाही, हेही महत्त्वाचे आहे.
मुंबईची चिंता वाढली; 30 लाख नावे गायब होण्याची शक्यता
SIRच्या प्रक्रियेत सर्वाधिक चिंता शहरी भागातील मतदारांबाबत व्यक्त केली जात आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये गणना अर्ज न मिळालेल्या मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील स्थिती विशेष चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून दिसते. मुंबईतील सुमारे 63 टक्के मतदारांची माहिती डिजिटाइज झाली आहे. मात्र, जवळपास 29 ते 30 टक्के मतदारांचे गणना अर्ज अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे मुंबईतील तब्बल 30 लाखांच्या आसपास मतदारांची नावे 24 ऑगस्टच्या प्रारूप मतदार यादीत दिसणार नसण्याची शक्यता आहे.
मुंबईसारख्या महानगरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्याने मतदारांच्या पत्त्यांमध्ये बदल, घर बंद असणे, मतदाराचे स्थलांतर तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नोंदी यामुळे ही संख्या वाढल्याचे मानले जात आहे. मात्र, पात्र मतदाराचे नाव चुकीने वगळले जाणार नाही, यासाठी निवडणूक यंत्रणेने पडताळणीची प्रक्रिया सुरू ठेवली आहे.
17 ऑगस्टपर्यंत मुदत; त्यानंतर प्रारूप यादी
गणना अर्ज जमा करण्यासाठी 17 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
या प्रारूप यादीवर 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर आवश्यक पडताळणी करून 27 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
त्यामुळे गणना अर्ज सादर न झालेल्या मतदारांनी 24 ऑगस्टनंतर आपले नाव प्रारूप यादीत आहे की नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
नाव नसेल तर फॉर्म 6; पत्ता बदलल्यास फॉर्म 8
प्रारूप मतदार यादीत पात्र मतदाराचे नाव आढळले नाही, तर संबंधित मतदाराला फॉर्म 6 भरून नाव समाविष्ट करून घेता येणार आहे. ही संधी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या कालावधीत उपलब्ध असेल.
तसेच 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही या कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.
मतदाराचा पत्ता बदलला असेल, छायाचित्र किंवा अन्य तपशीलात दुरुस्ती करायची असेल तर फॉर्म 8 भरता येईल. तर मतदार यादीतील एखादे नाव वगळायचे असल्यास फॉर्म 7 चा वापर करता येणार आहे.
BLO-बLAकडून संयुक्त पडताळणी
पात्र मतदारांची नावे कोणत्याही परिस्थितीत चुकीने वगळली जाऊ नयेत, यासाठी निवडणूक विभागाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांच्यामार्फत संयुक्त पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आवश्यकतेनुसार संबंधित मतदारांच्या घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. गणना अर्ज प्राप्त न झालेल्या मतदारांची यादी संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
‘नाव गायब’ झाले तरी संधी कायम
SIRच्या आकडेवारीमुळे राज्यातील तब्बल 1.80 कोटी मतदार आणि मुंबईतील सुमारे 30 लाख मतदारांबाबत चिंता निर्माण झाली असली, तरी प्रारूप यादीत नाव न दिसणे म्हणजे मतदानाचा अधिकार कायमचा गमावणे नव्हे, हे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी महिनाभराचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपल्या नावाची पडताळणी करणे आणि नाव नसल्यास निर्धारित मुदतीत फॉर्म 6 दाखल करणे आवश्यक आहे.
आता 17 ऑगस्टची गणना अर्जाची अंतिम मुदत आणि 24 ऑगस्टला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी या दोन तारखा मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. विशेषतः मुंबईतील लाखो मतदारांची नावे प्रारूप यादीत दिसतात की नाही, याकडे राजकीय पक्षांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदार यादीतील एकही पात्र नाव वगळले जाऊ नये आणि अपात्र नावे कायम राहू नयेत, यासाठी SIRची पुढील पडताळणी प्रक्रिया निर्णायक ठरणार आहे.

