नवी दिल्ली :
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत देशासाठी पदके जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले. यावेळी मोदी यांनी प्रत्येक खेळाडूशी आस्थेवाईकपणे संवाद साधत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. खेळाडूंनी देशाचा गौरव वाढवला असून, त्यांच्या यशातून देशातील तरुणांना प्रेरणा मिळेल, असे मोदी म्हणाले.
Always #Cheer4Bharat. pic.twitter.com/eSjh8o1Ris
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2026
पंतप्रधान मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंसोबत झालेल्या संवादाचा व्हिडिओही समाजमाध्यमावर पोस्ट केला. यावेळी त्यांनी बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन हिचे विशेष कौतुक केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान ग्लासगो येथील एका रेस्टॉरंटमध्ये भारताचा चुकीचा नकाशा प्रदर्शित करण्यात आल्याचा तिने घेतलेला आक्षेप आणि दाखवलेली देशभक्ती याबद्दल मोदी यांनी तिचे अभिनंदन केले.
‘तुम्ही केवळ पदके जिंकली नाहीत, पिढीला प्रेरणा दिली’
पदकविजेत्या खेळाडूंशी संवाद साधताना मोदी म्हणाले, “तुम्ही केवळ पदके जिंकली नाहीत, तर एका संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली आहे. ‘खेलेगा इंडिया, तो खिलेगा इंडिया’ हा मंत्र देशाच्या क्रीडा संस्कृतीला नवी दिशा देणारा आहे.” यावेळी त्यांनी खेळाडूंना ‘भारत माता की जय’चा जयघोषही करण्यास सांगितले.
मोदी यांनी मीराबाई चानू हिच्याशीही आस्थेवाईकपणे संवाद साधला. पदक जिंकल्यानंतर ती भावूक होऊन रडत असल्याचे पाहून, “मेडल जिंकल्यानंतर तू इतकी का रडत होतीस?” अशी विचारणा त्यांनी केली. याशिवाय नाशिकच्या दिलीप महाडू गावित याच्या कामगिरीचेही मोदी यांनी कौतुक केले.
‘सन्मान माझा, मेहनत पूर्णपणे तुमची’
खेळाडूंशी संवाद साधताना मोदी म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे; मात्र मेहनत पूर्णपणे तुमची आहे. तुम्हाला माझी आठवण आली, त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. स्पोर्ट्स व्यवस्था ही एक गोष्ट आहे; पण देश पदके तेव्हाच जिंकतो, जेव्हा देशात स्पोर्ट्स कल्चर निर्माण होते.”
यावेळी त्यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “मित्रांनो, तुम्ही खूप मोठे काम केले आहे. देशाचे नाव रोशन केले आहे. मी तुमचे खूप आभार मानतो. विश्वास ठेवा, पुढेही तुम्ही विजय मिळवाल आणि पुन्हा एकदा आपण इथे भेटू,” अशा शब्दांत मोदी यांनी संवादाचा समारोप केला.
मीराबाईला स्वतःच्या हाताने भरवला लाडू
संवादानंतर मोदी यांनी मीराबाई चानू हिला स्वतःच्या हाताने लाडू भरवला. तसेच तिच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. या आपुलकीच्या क्षणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील प्रत्येक पदकविजेत्या खेळाडूसोबत छायाचित्र काढून घेतले. खेळाडूंच्या यशाचे कौतुक करत मोदी यांनी त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

