मुंबई प्रतिनिधी
मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावे, हे सर्वसामान्यांचे स्वप्न असते. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न पूर्ण करणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत म्हाडाने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. आगामी काळात महामुंबई क्षेत्रात तब्बल साडेसात लाख घरे उभारण्याची तयारी म्हाडाने केली असून, पुढील घरांची लॉटरी जानेवारी २०२७ मध्ये जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो नागरिकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
मुंबई मंडळाच्या वतीने नुकतीच २ हजार ६४० घरांसाठी लॉटरीची सोडत काढण्यात आली. या सोडतीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल ७५ हजार १२७ अर्ज प्राप्त झाले होते. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५, अल्प उत्पन्न गटासाठी ८५६, मध्यम उत्पन्न गटासाठी ७९८, तर उच्च उत्पन्न गटासाठी ८४१ घरांचा समावेश होता.
या सोडतीनंतर पुढील लॉटरी कधी निघणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. अखेर म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पुढील लॉटरीबाबत महत्त्वाची घोषणा केली. जानेवारी २०२७ मध्ये मुंबई मंडळाची पुढील घरांची लॉटरी जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लॉटरीच्या प्रक्रियेला विलंब; मात्र नियमितता कायम
२ हजार ६४० घरांच्या लॉटरीला काही कारणांमुळे विलंब झाला असला, तरी म्हाडाची घरांची लॉटरी ही नियमित प्रक्रिया असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. सध्याच्या सोडतीला मिळालेला प्रतिसाद पाहता मुंबईत परवडणाऱ्या घरांची मागणी किती मोठी आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
लॉटरीच्या सोडतीच्या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महामुंबईत साडेसात लाख घरांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
मुंबई आणि परिसरातील वाढती घरांची मागणी लक्षात घेऊन म्हाडाकडून आगामी काळात महामुंबई क्षेत्रात साडेसात लाख घरे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि परिसरातील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
म्हाडाकडून केवळ विक्रीसाठी घरे उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांसाठी भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध करून देण्याची नवी संकल्पनाही राबविण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र रेंटल हाऊसिंग पोर्टल सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली.
१२ वर्षांची प्रतीक्षा; शंभरहून अधिक अर्ज अन् अखेर घर
म्हाडाच्या लॉटरीत यश मिळवण्यासाठी अनेक नागरिक वर्षानुवर्षे प्रयत्न करीत असतात. सध्याच्या सोडतीत विजेते ठरलेल्या नितीन कंदले यांचा अनुभवही असाच आहे.
खासगी विकसकांकडून घर घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने गेल्या १२ वर्षांपासून प्रत्येक म्हाडाच्या लॉटरीत अर्ज भरत होतो. मात्र, प्रत्येक वेळी निराशा पदरी पडत होती. तरीही म्हाडाच्या माध्यमातूनच घर मिळवण्याची इच्छा कायम होती. अखेर या लॉटरीत घर लागल्याने १२ वर्षांची प्रतीक्षा संपली. यासाठी आतापर्यंत शंभरहून अधिक अर्ज भरावे लागले, अशी भावना कंदले यांनी व्यक्त केली.
७५ हजार अर्ज; घरे मात्र २,६४०
सध्याच्या लॉटरीतील आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबईतील परवडणाऱ्या घरांची मागणी किती प्रचंड आहे, याचा अंदाज येतो. २,६४० घरांसाठी तब्बल ७५ हजार १२७ अर्ज आल्याने एका घरासाठी अनेक नागरिकांमध्ये स्पर्धा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात साडेसात लाख घरांच्या प्रकल्पामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या पुढील लॉटरीकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले असून, म्हाडाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळण्याची आशा पुन्हा एकदा बळावली आहे.

