स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : पैशांचे अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आणि पोलिसांची बतावणी करून धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या एका संघटित गुन्हेगारी टोळीवर खार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्यात आता ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम-१९९९) अंतर्गत कलमांचा अंतर्भाव करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वांद्रे विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) करत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी शुभंकर नारायण सालियन (वय ४२, रा. कांदिवली पश्चिम) यांना व्यवसायासाठी पैशांची गरज होती. यादरम्यान त्यांची ओळख ट्रेनमध्ये आरोपी इम्रान अहेमद शेख उर्फ जितेंद्र जिग्नेश याच्याशी झाली. आरोपीने फिर्यादीला पाच लाख रुपयांच्या बदल्यात दहा लाख रुपये देण्याचे लालच दाखवून आर्थिक प्रलोभन दिले. या प्रलोभनाला बळी पडून फिर्यादीने पैशांच्या देवाणघेवाणीसाठी संमती दर्शवली.
ठरल्यानुसार, गत २० जून २०२६ रोजी खार पश्चिम येथील रोड नंबर अकरावरील वृंदावन हॉटेलसमोर ही घटना घडली. फिर्यादी आपल्या मित्रासह ५० हजार रुपये रोख रक्कम घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. मात्र, मुख्य आरोपी स्वतः तिथे न जाता त्याने आपल्या साथीदारांना पाठवले. तिथे पोहचलेल्या आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला आपण पोलीस असल्याचा बनाव रचला आणि नंतर चाकूचा धाक दाखवून त्यांच्या ताब्यातील पैशांची बॅग बळजबरीने पळवून नेली. याप्रकरणी २१ जून २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता खार पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सराईत गुन्हेगारांचे जाळे उघडकीस
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा सखोल गुन्हेगारी इतिहास (Criminal Record) तपासला. यामध्ये संजय दशरथ म्हात्रे (वय ५०, रा. भिवंडी), शक्ती कुमार रामशिश सिंह (रा. किसन नगर, ठाणे) आणि इम्रान अहेमद शेख उर्फ जितेंद्र जिग्नेश (वय ४४, रा. वर्तक नगर, ठाणे) हे सराईत गुन्हेगार असून ते संघटितपणे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त यांच्याकडे ‘मकोका’ लावण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. वरिष्ठ पातळीवरून पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर आता या गुन्ह्यात ‘मकोका’ कायद्याच्या कलमांचा (३(१)(ii), ३(2), ३(4)) अधिकृतरीत्या अंतर्भाव करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून दहशत निर्माण करणाऱ्या या टोळीच्या जाळ्यात आणखी काही जण अडकले आहेत का, याचा कसून शोध घेतला जात आहे.

