मुंबई प्रतिनिधी
क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि युवा पत्रकारांचा गौरव करण्याच्या परंपरेला पुढे नेत मुंबई मराठी पत्रकार संघाने २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठीच्या प्रतिष्ठेच्या क्रीडा पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदा ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असून रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा या पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे.
संघातर्फे देण्यात येणारा ‘महेश बोभाटे स्मृती ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार’ २०२५ साठी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार रणजित दळवी यांना जाहीर करण्यात आला आहे. तर २०२६ सालचा हा पुरस्कार ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनील लवाटे यांना प्रदान केला जाणार आहे. दीर्घकाळ सातत्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार क्रीडा पत्रकारितेची दखल घेत या दोघांची निवड करण्यात आली आहे.
युवा क्रीडा पत्रकारांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा दिवंगत क्रीडा संपादक आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्कार २०२५ साठी बीबीसीच्या जान्हवी मुळे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर २०२६ सालचा हा पुरस्कार क्रीडा पत्रकार स्वदेश घाणेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. नव्या पिढीतील क्रीडा पत्रकारांनी केलेल्या गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी वृत्तांकनाची दखल म्हणून हा सन्मान दिला जातो.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी ही माहिती देताना सांगितले की, प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप १० हजार रुपये रोख, गौरवचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. पुरस्कार विजेत्यांचा गौरव मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विशेष क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाला तब्बल ८४ वर्षांची समृद्ध परंपरा लाभली असून पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्याची परंपरा संघाने सातत्याने जपली आहे. त्याच परंपरेचा भाग म्हणून क्रीडा पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. विशेष म्हणजे, यंदा या क्रीडा पुरस्कारांचे नववे वर्ष आहे.
क्रीडा क्षेत्रातील घडामोडी, खेळाडूंची कामगिरी, त्यांचा संघर्ष, यश-अपयश आणि विविध स्पर्धांचे अचूक, अभ्यासपूर्ण व जबाबदार वृत्तांकन करून वाचकांपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करणे हा या पुरस्कारांमागील प्रमुख उद्देश असल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघाने स्पष्ट केले आहे. क्रीडा पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि नव्या पिढीतील पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कारांचे महत्त्व विशेष मानले जाते.


