छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
‘कॉक्रोच’ जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी त्यांच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करण्याच्या मागणीवर तीव्र प्रतिक्रिया देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले आहे. “माझ्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आधी पंतप्रधानांची पदवी सार्वजनिक करण्याची मागणी करावी. त्यांनी त्यांची पदवी जाहीर केली, तर मी माझ्या शिक्षणाशी संबंधित शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज आणि इतर सर्व कागदपत्रे जनतेसमोर ठेवेन,” असे स्पष्ट वक्तव्य दिपके यांनी केले.
आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यानंतर प्रथमच आयोजित पत्रकार परिषदेत दिपके यांनी या आरोपांना सविस्तर उत्तर देताना केंद्र सरकार, केंद्रीय तपास यंत्रणा आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
पत्रकार परिषदेत बोलताना दिपके म्हणाले, “माझे परदेशात शिक्षण झाले आहे. त्या शिक्षणासाठी मला मिळालेल्या शिष्यवृत्तीची तसेच घेतलेल्या शैक्षणिक कर्जाची सर्व अधिकृत कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे माझ्या शिक्षणावर किंवा खर्चावर प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही. मात्र, माझ्यावर सातत्याने संशय घेतला जात असेल, तर देशाच्या पंतप्रधानांनीही त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत जनतेसमोर स्पष्टता आणली पाहिजे.”
यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना उद्देशून, “आधी त्यांची पदवी सार्वजनिक करा. त्यांनी ती जाहीर केली तर मी माझ्या शिक्षणाशी संबंधित प्रत्येक कागदपत्र जनतेसमोर मांडेन,” असे आव्हान दिले.
‘ईडी-सीबीआय पाठवत असाल तर सोबत पदवीही पाठवा’
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरही दिपके यांनी जोरदार टीका केली. “सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांना गप्प बसवण्यासाठी ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. जर माझ्याकडे ईडी किंवा सीबीआय पाठवायचीच असेल, तर त्यांच्यासोबत पंतप्रधानांची पदवीही पाठवून द्या. मग जनतेलाही सत्य कळेल आणि मला देखील माझी सर्व कागदपत्रे दाखवायला कोणतीही हरकत राहणार नाही,” असे ते म्हणाले.
दिपके यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा चर्चेत आला असून त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
५ ऑगस्टला ‘कॉक्रोच’ जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक
संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत माहिती देताना दिपके यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे अधिकृत प्रवक्ते, प्रमुख पदाधिकारी आणि कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार असून आगामी राजकीय आणि सामाजिक भूमिकांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
“पक्षाचा पुढील अजेंडा काय असावा, कोणत्या लोकहिताच्या प्रश्नांवर संघर्ष उभारायचा, तसेच युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर कोणती भूमिका घ्यायची, यावर या बैठकीत निर्णय घेतला जाईल,” असेही त्यांनी सांगितले.
झारखंडमधील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा
झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबतही दिपके यांनी भूमिका स्पष्ट केली. “कालच माझी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. ‘कॉक्रोच’ जनता पार्टी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांनी आंदोलन सुरू ठेवावे. त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी आमचा पक्ष कटिबद्ध आहे,” असे त्यांनी नमूद केले.
‘नवीन पक्ष नाही; जनआंदोलनावर भर’
राजकारणातील भविष्यातील भूमिकेबाबत विचारले असता दिपके यांनी सध्या नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.
“देशातील पारंपरिक राजकीय पक्षांच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अशा परिस्थितीत आणखी एक राजकीय पक्ष स्थापन करून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे सध्या आमचा भर जनआंदोलन उभारण्यावर आहे,” असे त्यांनी सांगितले.
मतदान प्रक्रियेबाबत शंका व्यक्त करताना ते म्हणाले, “आज नागरिक एका पक्षाला मतदान करतात; मात्र निवडून आलेले लोकप्रतिनिधी नंतर पक्ष बदलतात. केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणून पक्ष फोडले जात असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकशाहीवरील विश्वास टिकवण्यासाठी व्यापक जनजागृती आणि लोकआंदोलनाची गरज आहे.”
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
अभिजीत दिपके यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेच्या चौकशीच्या मागणीबरोबरच पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणावर विविध राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिपके यांनी केलेले आरोप आणि दावे हे त्यांचे वैयक्तिक विधान असून, संबंधित मुद्द्यांवर अधिकृत यंत्रणा किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


