विरार, प्रतिनिधी
विरारच्या नारंगी गावात घरगुती वादातून झालेल्या धक्काबुक्कीत सासऱ्याने दिलेल्या जोरदार धक्क्यामुळे सुनेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. प्राची पाटील (वय २८) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी सासरे गणपत पाटील यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे प्राची यांच्या आठ महिन्यांच्या मुलीवर मातृछत्र हरपले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राची पाटील या पती कल्पेश पाटील आणि सासरे गणपत पाटील यांच्यासह विरारच्या नारंगी गावातील भगत आळी येथे वास्तव्यास होत्या. गुरुवारी सकाळी प्राची आणि त्यांच्या सासऱ्यांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. यावेळी गणपत पाटील यांनी सुनेला शिवीगाळ केल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राची यांचा भाऊ विशाल हा तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी घरी आला.
दरम्यान, विशाल घरी आल्यानंतर पुन्हा दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला. त्या वेळी गणपत पाटील यांच्या खांद्यावर असलेल्या चिमुकलीला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न प्राची यांनी केला. यामुळे दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. याच वेळी गणपत पाटील यांनी प्राची यांना जोराचा धक्का दिल्याने त्या खाली कोसळल्या. पडताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि कुटुंबीयांनी प्राची यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून गणपत पाटील यांना अटक केली आहे. दरम्यान, प्राची यांचा सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ होत होता का, याचाही पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.

