मुंबई प्रतिनिधी
राज्यात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून शुक्रवार (३१ जुलै) रोजी राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः नाशिक आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच दक्षिण महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, दक्षिण कोकण आणि गोवा परिसरातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
घाटमाथ्यावर विशेष सतर्कतेची गरज
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे, नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
रेड अलर्ट
नाशिक घाट परिसर
पुणे घाट परिसर
ऑरेंज अलर्ट
पालघर
ठाणे
रायगड
धुळे
नंदुरबार
जळगाव
नाशिक
सातारा घाट परिसर
यलो अलर्ट
मुंबई
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
अहिल्यानगर
कोल्हापूर घाट परिसर
छत्रपती संभाजीनगर
जालना
बीड
अकोला
अमरावती
बुलढाणा
वर्धा
वाशिम
यवतमाळ
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
हवामान विभागाने शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असल्याने काढणीस तयार असलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे, शेतातील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी तसेच वीजांचा कडकडाट सुरू असताना शेतात काम करणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
३१ जुलैचा सविस्तर हवामान अंदाज
उत्तर मध्य महाराष्ट्र: विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी आणि ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे.
उत्तर कोकण: मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे.
मराठवाडा: मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पाऊस, काही ठिकाणी वेगवान वारे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र (घाट परिसर): मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता.
दक्षिण कोकण-गोवा: अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज.
दरम्यान, पुढील २४ तास राज्यातील अनेक भागांसाठी महत्त्वाचे ठरणार असून, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या इशाऱ्यांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः घाटमाथा, डोंगराळ भाग, नदीकाठची गावे आणि पूरप्रवण क्षेत्रांतील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


