धाराशिव प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील भूम नगर परिषदेत मुख्याधिकारी आणि नगरसेवकांमधील वाद आता चांगलाच चिघळला असून, मुख्याधिकारी शैला डाके यांनी आपल्या जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना पत्र पाठवून मुख्याधिकारी डाके यांना शासकीय कामकाजादरम्यान पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या पत्रानुसार, भूम नगर परिषदेतील जनविकास आघाडीचे आठ नगरसेवक वारंवार मुख्याधिकारी शैला डाके यांच्यावर दबाव टाकत असून, त्यांना धमकावणे, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, कार्यालयीन कामकाजात अडथळे निर्माण करणे तसेच प्रशासकीय निर्णयांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या परिस्थितीत मुख्याधिकाऱ्यांना शासकीय कर्तव्य बजावताना सुरक्षेची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
ज्या नगरसेवकांविरोधात तक्रार करण्यात आली आहे त्यामध्ये रुपेश शेंडगे, अनिल शेंडगे, चंद्रमणी गायकवाड, आबासाहेब मस्कर, रामराजे कुंभार, नवनाथ रोकडे, विठ्ठल बागडे आणि श्री. पवार यांचा समावेश आहे. या सर्वांकडून आपल्या कामात सातत्याने अडथळे निर्माण होत असून, अप्रत्यक्षपणे जीवितालाही धोका असल्याची भावना मुख्याधिकारी डाके यांनी व्यक्त केल्याचे प्रशासनाच्या पत्रातून स्पष्ट झाले आहे.
भूम नगर परिषदेतील कारभार आणि प्रशासन-लोकप्रतिनिधींमधील संघर्षाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभर सुरू होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पोलीस अधीक्षकांना संरक्षणाबाबत पत्र पाठवल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनातही या घडामोडींमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या संदर्भात मुख्याधिकारी शैला डाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या तक्रारीमागील नेमकी कारणे आणि पुढील भूमिका याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
दुसरीकडे, आरोप करण्यात आलेल्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी उलट मुख्याधिकारी शैला डाके यांच्या कथित भ्रष्टाचाराबाबत विविध स्तरावर तक्रारी दाखल केल्याचा दावा केला आहे. त्या तक्रारींचा राग मनात धरून तसेच सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून आपल्याला बदनाम करण्यासाठी आणि दबाव आणण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे भूम नगर परिषदेतील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि मुख्याधिकाऱ्यांना संरक्षण दिले जाते का, याकडे आता संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तसेच, दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाल्यानंतरच या वादाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे.


