मुंबई प्रतिनिधी
माहीम कॉजवे परिसरात भरधाव वेगाने आलेल्या KTM दुचाकीने रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या महिलेला जोरदार धडक दिल्याची भीषण घटना सोमवारी (२७ जुलै) रात्री घडली. या अपघातात महिला आणि दुचाकीस्वार असे दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी माहीम पोलिसांनी निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी मृत दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला अशोक तांडेल या आपल्या दोन मुलींसह २७ जुलै रोजी रात्री सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास माहीम कॉजवे परिसरातील जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग ओलांडण्यासाठी उभ्या होत्या. त्याचवेळी एमएच-०५-डीजे-४८१० क्रमांकाची KTM दुचाकी भरधाव वेगाने आली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने किंवा वेगावर नियंत्रण न राहिल्याने दुचाकीने मंगला तांडेल यांना जोरदार धडक दिली.
या धडकेत मंगला तांडेल यांच्यासह दुचाकीस्वार ध्रुव मनोज गुरव (२१) हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता एवढी होती की, धडकेनंतर दोघेही रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.
मंगला तांडेल यांना नागरिकांच्या मदतीने तातडीने सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनही उपचारादरम्यान रात्री सुमारे १०.१५ वाजता त्यांना मृत घोषित केले. दुसरीकडे, अपघातात गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वार ध्रुव गुरव यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेप्रकरणी मंगला तांडेल यांचे पती अशोक तांडेल यांनी माहीम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत दुचाकीस्वार ध्रुव गुरव याच्याविरोधात मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) आणि २८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या भीषण अपघातामुळे माहीम कॉजवे परिसरात काही काळ खळबळ उडाली. भरधाव वेगाने वाहन चालविणे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास माहीम पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रियाज मेहबूब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, दुचाकीचा वेग किती होता आणि घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये नेमके काय चित्रित झाले आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.


