अहिल्यानगर प्रतिनिधी
‘मला डॉक्टर व्हायचं होतं… तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं; पण मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही…’ अशा शब्दांत आपल्या मनातील व्यथा व्यक्त करत अहिल्यानगर जिल्ह्यातील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. NEET परीक्षेतील गुण, प्रवेशासाठीची धडपड आणि पेपरफुटीच्या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून अंकिता अस्वस्थ झाली होती, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. तिच्या मृत्यूपूर्वी सापडलेल्या चिठ्ठीमुळे या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत असलेल्या परिणामाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अंकिता सांगळे हिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने ती NEET परीक्षेची तयारी करीत होती. पहिल्या प्रयत्नात तिला अपेक्षित गुण मिळाल्यानंतरही पेपरफुटीच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने तिच्या भवितव्याबाबत संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर तिने पुन्हा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात तिला १६६ गुण मिळाले. वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेला कटऑफ १७७ पर्यंत गेल्याने तिला प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे ती मोठ्या मानसिक तणावात होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
अखेर या नैराश्यातून अंकिताने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना अंकिताने लिहिलेली एक चिठ्ठीही आढळून आली असून, त्यात तिने आई-वडील आणि भावाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच आपल्या निर्णयासाठी कुटुंबीयांना जबाबदार धरू नये, असेही तिने स्पष्ट केले आहे.
‘दादा, तू मम्मी-पप्पांपेक्षा जास्त जीव लावलास…’
अंकिताने आपल्या चिठ्ठीत कुटुंबीयांविषयीच्या भावना अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत मांडल्या आहेत. ‘तुम्ही मला एवढा जीव लावला, मी तुमची एकही इच्छा पूर्ण करू शकले नाही. मम्मी, तू तर प्रत्येक संकटात मैत्रीण म्हणून माझी साथ दिलीस. दादा, तूही मला खूप साथ दिलीस. मम्मी-पप्पांपेक्षा तू माझ्यावर जास्त जीव लावलास,’ अशा शब्दांत तिने आपल्या भावनांना वाट करून दिली.
‘माझ्या निर्णयासाठी तुम्ही जबाबदार नाही. तुम्ही मला जे सुख दिले, ते मी कधीच विसरू शकत नाही. दादा, तू मम्मी-पप्पांना चांगले सांभाळ. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देऊ नकोस. तुम्ही आनंदी राहा. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा,’ अशी भावनिक विनंतीही तिने आपल्या कुटुंबीयांना केली आहे.
NEETच्या तयारीदरम्यान कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाचाही तिने चिठ्ठीत उल्लेख केला आहे. ‘आधीपासूनच मी NEETचा अभ्यास करत होते. तेव्हा तुम्ही माझ्यासाठी सगळ्या गोष्टींचा त्याग केला. पण मी काय केले? मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही,’ या भावनिक शब्दांत तिने आपल्या मनातील खंत व्यक्त केली.
शेवटी, ‘आता कसला त्रास करून घेऊ नका, आनंदी राहा,’ असा संदेश देत तिने आपल्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. ‘तुमची दीदी, अंकिता’ या शब्दांनी चिठ्ठीचा शेवट केला आहे.
NEET पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
अंकिताच्या मृत्यूमुळे NEET परीक्षेतील कथित पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. परीक्षेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि कथित गैरप्रकारांविरोधात देशभरातून आवाज उठवण्यात आला.
दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलनही झाले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे.
अंकिताच्या घटनेनंतरही परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची चौकशी, दोषींवर कारवाई आणि विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
‘पेपरफुटीतील आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी अंकिताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अंकिताच्या मृत्यूमागील परिस्थितीची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
NEET पेपरफुटीच्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त झाले असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अंकिताच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचीही चौकशी करून, NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार लंके यांनी केली.
अंकिताच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका तरुणीचा अशा प्रकारे अंत झाल्याने परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांवर वाढत जाणारा मानसिक ताण याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्याला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


