अमरावती प्रतिनिधी
मेळघाटातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप होत असतानाच विषबाधेच्या घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. धारणी तालुक्यातील टीटम्बा, बिजू धावडी आणि सावलीखेडा येथील आश्रमशाळांनंतर आता सुसर्दा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनाही अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या चारही घटनांमध्ये आतापर्यंत 100 हून अधिक विद्यार्थी बाधित झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. दयाराम जावरकर यांनी दिली आहे.
सुसर्दा येथील आश्रमशाळेतील 15 ते 20 विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या, मळमळ आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवू लागला. या विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी साद्राबाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जात असल्याची माहिती मिळत आहे. या नव्या घटनेमुळे मेळघाटातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मेळघाटातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून भोजन पुरवले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत एकापाठोपाठ एक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना विषबाधा होत असल्याने या भोजन व्यवस्थेच्या गुणवत्तेवर आणि देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणारे अन्न नेमके कुठे, कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या दर्जाच्या साहित्यापासून तयार केले जाते, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता पालकांकडून होत आहे.
टीटम्बा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शनिवारी जेवण केल्यानंतर अचानक उलट्या आणि मळमळीची तक्रार सुरू केली. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. दुचाकी, टेम्पो, रिक्षा अशा मिळेल त्या वाहनांतून विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बिजू धावडी आणि सावलीखेडा येथील आश्रमशाळांमध्येही विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना समोर आल्या. आता सुसर्दा येथील घटनेने या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे.
दरम्यान, टीटम्बा येथील घटनेत 100 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. दयाराम जावरकर यांनी दिली. त्यापैकी 69 विद्यार्थ्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर 62 विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, सात विद्यार्थी अद्याप उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेले भोजन, अन्नपदार्थ तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या अहवालानंतरच विषबाधा नेमकी कशामुळे झाली, हे स्पष्ट होईल, अशी माहिती डॉ. जावरकर यांनी दिली.
पालकांचा संताप; मंत्र्यांसमोर घोषणाबाजी
विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी धारणी येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी संतप्त पालकांनी मंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली सेंट्रल किचन व्यवस्था तातडीने बंद करण्याची मागणी पालकांनी केली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, अशी भूमिका घेत पालकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी सेंट्रल किचन बंद करण्याबाबत मंत्री अशोक उईके यांनी आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे.
‘शासकीय आश्रमशाळांमध्ये नेमके काय शिजतंय?’
मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर सुविधा आणि निधी उपलब्ध करून दिला जात असताना, एकाच परिसरातील चार आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या घटना घडणे ही गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे सेंट्रल किचनमधून होणाऱ्या भोजन पुरवठ्याची गुणवत्ता, स्वच्छता, अन्न साठवणूक आणि वितरण व्यवस्थेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
अन्न व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असले तरी अहवाल येईपर्यंत प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी पालक आणि स्थानिकांकडून होत आहे. चार आश्रमशाळांमधील विषबाधेच्या घटनांमुळे आता प्रशासनाच्या भोजन व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, ‘आदिवासी विद्यार्थ्यांच्या ताटात नेमके काय वाढले जात आहे आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची?’ असा संतप्त सवाल मेळघाटातून उपस्थित केला जात आहे.


