मुंबई प्रतिनिधी
शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक शिवतीर्थावर रविवारी तरुणाईचा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला. हातात तिरंगा, मनात देशभक्ती आणि सरकारच्या कारभाराविरोधात तीव्र संताप घेऊन मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून हजारो तरुण-तरुणी शिवाजी पार्कवर दाखल झाले होते. या गर्दीला संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत देशातील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाल्याचा दावा केला. ‘अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले आहेत. आता भाजप विरुद्ध भारत अशा संघर्षाची सुरुवात झाली आहे,’ असा थेट एल्गार उद्धव ठाकरे यांनी केला.

‘आज मी देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करतो. अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले आहेत. या संघर्षाची सुरुवात झाली आहे. हा संघर्ष आता भाजप विरुद्ध भारत असा सुरू झाला आहे. एका झुरळाने हुकूमशहाला नमवले आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे,’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर उपरोधिक टीका केली.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. ‘मोदीजी, आतातरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री काम सोडून पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. त्यांना सांगा, आता देशाचे काम करा,’ असे आवाहन त्यांनी केले.
अर्थव्यवस्था, महागाई आणि रुपयाच्या घसरणीवरूनही उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. ‘अर्थमंत्री निर्मला सीतारामन घसरता रुपया आणि वाढती महागाई यावर बोलत नाहीत; मात्र पेपरफुटीचे फायदे समजावून सांगत आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देशाच्या संरक्षणाची चिंता करण्याऐवजी धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी पुढे आले. तर रस्ते वाहतूकमंत्री इथेनॉलवर बोलत आहेत,’ असा टोला त्यांनी लगावला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आणखी गंभीर आरोप केले. ‘तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना तुम्हाला ज्या यातना झाल्या असतील, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त यातना आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबीयांना झाल्या आहेत. त्या वेदना आम्ही विसरणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.
‘ही ठिणगी आता पडली आहे आणि देशभर वणवा पेटला आहे,’ असे सांगत उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाची धार कायम ठेवण्याचे आवाहन केले.
‘निवडणुका गेल्या खड्ड्यात; माणसं आणि मनं चोरता येत नाहीत’
आगामी निवडणुकांना अद्याप तीन वर्षांचा कालावधी असल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांनाही उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘काहीजण विचारतात, निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत. अहो, निवडणुका गेल्या खड्ड्यात! मोदींनी आता पाहिले आहे की मतं चोरी करता येतात; पण माणसं चोरी करता येत नाहीत. मनं चोरता येत नाहीत. ही मनं आता पेटलेली आहेत,’ असे ते म्हणाले.
ही जागृती आणि असंतोष कायम ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तरुणांना धमक्या देणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करताना त्यांनी, ‘अंधभक्त मुलांना धमक्या देत असतील तर त्यांचे व्हिडीओ काढा आणि पोस्ट करा. जिथे सापडतील तिथे त्यांना राष्ट्रभक्ती शिकवा,’ असे आवाहन केले.
‘तरुणाईने इतिहासात सुवर्णपान लिहिले’
शिवाजी पार्कवर जमलेल्या तरुणाईचे कौतुक करताना उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाची नोंद देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, असा दावा केला.
‘तरुणांनी देशाच्या इतिहासातले सुवर्णपान लिहिले आहे. तुमच्या शक्तीची आणि एकजुटीची नोंद देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र आता आलेली ही जागृती जाऊ देऊ नका. सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करू नका. देशाची शक्ती काय असते, हे दाखवून दिलेल्या या देशाला पुन्हा कुणालाही कमजोर करू देऊ नका,’ असे आवाहन त्यांनी केले.
राज ठाकरे काय म्हणाले?
शिवाजी पार्कवरील या विजयी जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या आंदोलनात तरुणाईने दाखवलेली एकजूट, देशभर निर्माण झालेला असंतोष आणि केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात उभा राहिलेला जनक्षोभ याबाबत राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यास या संपूर्ण घडामोडींना आणखी राजकीय धार मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक भाषणामुळे शिवाजी पार्कवरील वातावरण चांगलेच तापले. ‘देशभक्त विरुद्ध अंधभक्त’ आणि ‘भाजप विरुद्ध भारत’ या घोषणांमधून त्यांनी केंद्र सरकारविरोधातील संघर्षाची दिशा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आगामी काळात या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


