मुंबई प्रतिनिधी
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशाच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचा दावा करण्यात येत आहे. या राजीनाम्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सरकारला पुन्हा लक्ष्य केले आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस अत्याचारांचा आणि आंदोलनातील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचा कोणताही स्पष्ट उल्लेख नसल्याचे सांगत आंबेडकर यांनी दोन प्रमुख मुद्दे उपस्थित केले आहेत.
पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिल्याचे त्यांच्या राजीनाम्याच्या मजकुरावरून दिसते. आंदोलनात समाजकंटक घुसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे; मात्र आंदोलनादरम्यान जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांबाबत कोणतीही खंत व्यक्त करण्यात आलेली नाही. तसेच पोलिसांकडून झालेल्या कथित अमानुष अत्याचारांचा उल्लेखही राजीनाम्यात नाही. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबतही सरकारने स्पष्ट भूमिका मांडलेली नाही, अशी टीका त्यांनी केली.
‘राजीनाम्याने आगीत तेल ओतले’
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘राजीनामा देऊन त्यांनी आगीत तेल ओतले आहे. जे झुकणार नाही, असे सांगितले जात होते, त्यांना आता नाक रगडावे लागले,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारला लक्ष्य केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचाही त्यांनी संदर्भ देत सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंदोलनादरम्यान केलेल्या वक्तव्यांवरही त्यांनी टीका केली. ‘आंदोलकांना झुरळ म्हणणे आणि लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचे सांगणे, ही सरकारची भूमिका होती. मात्र आता विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’ असे आंबेडकर म्हणाले.
परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि आंदोलनादरम्यान झालेल्या कथित अत्याचारांबाबत सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. नुकसानभरपाई आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांबाबत सरकार स्पष्टपणे बोलत नसेल, तर विद्यार्थ्यांनी आंदोलनातून माघार का घ्यावी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांनी पुढील आंदोलनाबाबत जो निर्णय घ्यावा, त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
राजीनाम्यापूर्वीच आंबेडकरांचा सरकारला इशारा
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला होता. जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.
‘कारवाई झाली, पण ती उशिरा झाली. जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली जात नाही,’ असे आंबेडकर यांनी म्हटले होते.
‘धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आठवडाभरात झाला नाही, तर लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन करण्यात येईल,’ असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंबेडकर यांच्या आधीच्या भूमिकेचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आंदोलनाला राजकीय स्वरूप न देण्याचा सल्ला
नीट प्रकरणाविरोधातील आंदोलनाला राजकीय स्वरूप येऊ नये, याची आंदोलकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले होते. आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांना आपण निरोप पाठवला असून, आंदोलनाची दिशा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपुरतीच मर्यादित ठेवावी, असे त्यांनी सांगितले होते.
शरद पवार यांच्यासह राजकीय नेत्यांना आंदोलनापासून दूर ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली होती. शिक्षणमंत्र्यांच्या राजीन्यासोबतच सर्व लोकप्रतिनिधींनीही विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर स्पष्ट भूमिका घ्यावी. जे लोकप्रतिनिधी या मागणीला पाठिंबा देणार नाहीत, त्यांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
राजकीय पक्ष आणि आंदोलकांनी एकत्रितपणे आंदोलनाचा आराखडा निश्चित करून पुढील दिशा ठरवावी, अशी भूमिकाही आंबेडकर यांनी यापूर्वी मांडली होती.
प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, परीक्षा व्यवस्थेत कोणत्या सुधारणा केल्या जातील आणि आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईबाबत सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेले प्रश्न केंद्र सरकारसाठी नव्या राजकीय आणि प्रशासकीय आव्हानांना जन्म देण्याची शक्यता आहे.


