नवी दिल्ली वृत्तसंस्था
पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचालींना वेग आल्यानंतर दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर व्हिडीओ संदेश प्रसिद्ध करून पेपरफुटीविरोधात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले. शुक्रवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यावर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही तासांतच सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर आपले आमरण उपोषण मागे घेतले.
We are relieved and grateful that Sonam sir has ended his hunger strike after 26 days.
Thank you, sir, for your extraordinary courage and sacrifice. By putting your own life on the line, you awakened the conscience of an entire nation. Your life is far too precious to this… pic.twitter.com/XXaubgkEbW
— Cockroach is Back (@Cockroachisback) July 23, 2026
सोनम वांगचुक यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असताना जे. पी. नड्डा यांच्यासह काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत पेपरफुटीविरोधातील उपाययोजना आणि आंदोलनाच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. चर्चेनंतर वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. उपोषण सोडल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली असून, त्यासोबत काही छायाचित्रेही शेअर केली आहेत.
मात्र, वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी पेपरफुटीविरोधातील आंदोलन थांबणार नसल्याचे कॉकरोच जनता पार्टीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रात्री सोशल मीडियावर व्हिडीओ संदेश प्रसिद्ध करून वांगचुक यांनी उपोषण सोडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. देशातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि संपूर्ण देशाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले, असे दीपके यांनी म्हटले.
‘तुमच्या धाडसाबद्दल आणि त्यागाबद्दल आभार. तुमचा जीव देशासाठी महत्त्वाचा आहे,’ असे म्हणत दीपके यांनी वांगचुक यांच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, त्याचवेळी जंतर मंतरवर सीजेपीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर मंतरसह देशातील विविध भागांत आंदोलन सुरू आहे. या प्रकरणी विरोधकांनीही केंद्र सरकारला लक्ष्य केले असून, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ संदेशाकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या दिशेने सरकारने पावले उचलली असून, शुक्रवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावित विधेयकाच्या मसुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या कायद्यात पेपरफुटीच्या प्रकरणांची जलदगतीने सुनावणी करण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालये आणि दोषींवर कठोर शिक्षेची तरतूद असण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
‘पेपरफुटीचा मुद्दा काही साधा नाही. यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,’ असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात म्हटले.
सरकारकडून कठोर कायद्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्याने पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला नवे वळण मिळाले असले, तरी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सीजेपी ठाम आहे. त्यामुळे सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी जंतर मंतरवरील आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


