मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात दोन आठवड्यांसाठी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यानुसार, २३ जुलैच्या मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ते ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. संभाव्य शांतताभंग, सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका तसेच जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीची शक्यता लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत सोमवारी (२० जुलै) यासंदर्भातील आदेश जारी केला. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काळात काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्बंध लागू करण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काय राहणार बंद?
जमावबंदीच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल. तसेच कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्यावर निर्बंध असतील. मिरवणुकांमध्ये बँड वाजवणे आणि फटाके फोडण्यासही मनाई करण्यात आली आहे. ध्वनिक्षेपक किंवा लाउडस्पीकरच्या वापराबाबतही निर्बंध लागू राहणार आहेत.
काय सुरू राहणार?
सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी काही नियमित आणि अत्यावश्यक उपक्रमांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. त्यानुसार-
– विवाह आणि संबंधित कौटुंबिक समारंभ
– अंत्यविधी आणि अंत्ययात्रा
– कंपन्या, क्लब आणि सहकारी संस्थांच्या नियमित सभा
– कारखाने, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांचे नियमित कामकाज
– न्यायालये आणि शासकीय कार्यालये
– स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज
– शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांचे नियमित उपक्रम
– चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि इतर सार्वजनिक मनोरंजन स्थळांमधील नियोजित कार्यक्रम
यांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
परवानगी घेतल्यास सभा, मिरवणुकीला मुभा
विशिष्ट परिस्थितीत संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांची (DCP) पूर्वपरवानगी घेऊन सभा किंवा मिरवणूक आयोजित करता येणार आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यापूर्वी संबंधित पोलीस विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. निर्बंधांच्या कालावधीत दाखल झालेल्या प्रकरणांचा तपास आदेशाची मुदत संपल्यानंतरही सुरू राहणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, या आदेशाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे, न्यायालये आणि पोलीस ठाण्यांमध्ये सूचना फलक लावण्यात येत आहेत. तसेच प्रसारमाध्यमे आणि सार्वजनिक घोषणांच्या माध्यमातूनही नागरिकांना या निर्बंधांची माहिती देण्यात येत आहे.


