बीड प्रतिनिधी
मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. जामीन नाकारण्याच्या आदेशाचा पुनर्विचार व्हावा, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली त्याची पुनर्विलोकन (रिव्ह्यू) याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे कराडला तातडीने कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता संपुष्टात आली असून, त्याचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम कायम राहणार आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या बहुचर्चित प्रकरणात अटक झालेला वाल्मिक कराड गेल्या दीड वर्षांपासून कारागृहात आहे. अटकेनंतर जामीन मिळवण्यासाठी त्याने जिल्हा व सत्र न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत अनेकदा प्रयत्न केले. मात्र प्रत्येक वेळी न्यायालयांनी गुन्ह्याचे गांभीर्य, तपासाची स्थिती आणि इतर कायदेशीर बाबींचा विचार करून जामीन अर्ज फेटाळला.
उच्च न्यायालयातूनही दिलासा न मिळाल्यानंतर कराडने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्या आदेशाचा पुनर्विचार व्हावा, या मागणीसाठी त्याने रिव्ह्यू पिटीशन दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेलाही कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट करत ती फेटाळून लावली.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, ज्या निर्णयाचे पुनर्विलोकन मागितले गेले आहे, त्या आदेशामध्ये नोंदींवरून स्पष्ट दिसणारी कोणतीही त्रुटी किंवा कायदेशीर चूक आढळून येत नाही. त्यामुळे आधीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. परिणामी रिव्ह्यू याचिका नामंजूर करण्यात आली.
या निर्णयामुळे वाल्मिक कराडच्या कायदेशीर लढ्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जामिनासाठी उपलब्ध असलेला आणखी एक महत्त्वाचा पर्याय न्यायालयाने बंद केल्याने त्याला सध्या तरी कोणताही दिलासा मिळालेला नाही.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या गुन्ह्यांपैकी एक मानले जाते. या प्रकरणाच्या तपासाकडे सुरुवातीपासूनच राज्याचे लक्ष लागले होते. न्यायालयीन प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर या प्रकरणातील घडामोडींवर बारकाईने नजर ठेवली जात असून, सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयानंतर या खटल्याच्या पुढील सुनावण्यांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.


