मुंबई प्रतिनिधी
राज्य शासनाने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या जयंतीचा समावेश २०२६ सालातील राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांच्या यादीत केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून, येत्या २२ जुलै २०२६ रोजी राज्यभर शासकीय स्तरावर अजित पवार यांची जयंती प्रथमच अधिकृतपणे साजरी केली जाणार आहे.
या निर्णयानुसार मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा परिचय करून देणारे कार्यक्रम, व्याख्याने आणि स्मरणपर उपक्रमही आयोजित करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे अजित पवार यांच्या जयंतीला शासकीय मान्यता देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शासनाने तातडीने निर्णय घेत सामान्य प्रशासन विभागामार्फत परिपत्रक जारी केले.
परिपत्रकानुसार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सर्व संबंधित विभागप्रमुखांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालयांमध्ये जयंती कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या निर्णयामुळे यापुढे दरवर्षी २२ जुलै रोजी राज्यभर अधिकृत स्वरूपात अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाणार आहे.
अजित पवार यांनी अनेक दशकांच्या राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर मजबूत पकड, निर्णयक्षम नेतृत्व आणि विकासाभिमुख कार्यशैलीमुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. पायाभूत सुविधांचा विकास, सिंचन, कृषी, उद्योग, नागरी विकास आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतल्याची नोंद राजकीय व प्रशासकीय वर्तुळात घेतली जाते.
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ निर्णय घेणारे, अधिकाऱ्यांकडून कामात दिरंगाई झाल्यास थेट जाब विचारणारे आणि लोकांच्या अडचणींसाठी घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा होती. ग्रामीण भागापासून ते शहरी विकास प्रकल्पांपर्यंत त्यांनी केलेल्या कामामुळे राज्यभरात त्यांना ‘दादा’ म्हणून मोठा जनाधार लाभला होता.
२८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात त्यांचे निधन झाल्यानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला होता. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निधनाला महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी असल्याची भावना व्यक्त केली होती.
आता त्यांच्या जयंतीला शासकीय मान्यता मिळाल्याने त्यांच्या लोकसेवेचा वारसा आणि विकासाभिमुख कार्याची आठवण अधिकृत स्तरावर जपली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाला ही अधिकृत आदरांजली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.


