सातारा प्रतिनिधी
पतीच्या अकाली निधनानंतर दुःखात खचून न जाता, दोन लहान मुलांच्या संगोपनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत देशसेवेचे व्रत स्वीकारणाऱ्या वाई तालुक्यातील विरमाडे येथील वीरपत्नी सोनल विजय सोनावणे यांनी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) दलात निवड मिळवून जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशाकडे केवळ वैयक्तिक उपलब्धी म्हणून नव्हे, तर देशसेवेच्या मूल्यांना दिलेली भावपूर्ण सलामी म्हणून पाहिले जात आहे.
सोनल सोनावणे यांचे पती विजय सोनावणे हे भारतीय सुरक्षा दलात कार्यरत होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी ते सुटीसाठी मूळ गावी विरमाडे येथे आले असताना आनेवाडी टोलनाका परिसरात झालेल्या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने सोनावणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. कर्तव्यदक्ष जवानाच्या अकाली निधनाने विरमाडे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.
या घटनेनंतर सोनल यांच्यासमोर आयुष्याचे मोठे आव्हान उभे राहिले. पतीच्या निधनाचे दुःख, दोन मुलांचे संगोपन, कुटुंबाची जबाबदारी आणि भविष्यातील अनिश्चितता अशा अनेक संकटांना त्यांना सामोरे जावे लागले. मात्र, परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी स्वतःला सावरले आणि पतीने जपलेल्या देशसेवेच्या स्वप्नाला पुढे नेण्याचा निर्धार केला.
याच ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस दलाच्या भरतीसाठी तयारी सुरू केली. शारीरिक तंदुरुस्ती, लेखी परीक्षा आणि इतर सर्व टप्प्यांसाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. घरातील जबाबदाऱ्या सांभाळत अभ्यास आणि सराव यांचा समतोल राखणे हे मोठे आव्हान होते. मात्र, जिद्द, शिस्त आणि अथक परिश्रम यांच्या बळावर त्यांनी प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार केला आणि अखेर ITBPमध्ये निवड मिळवली.
सोनल यांच्या या यशामुळे विरमाडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. गावातील नागरिक, माजी सैनिक, सामाजिक संस्था तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले आहे. अनेकांनी त्यांच्या प्रवासाला संकटावर मात करून उभ्या राहिलेल्या स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
देशसेवेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पतीच्या स्मृतींना कृतीतून अभिवादन करण्याचा सोनल यांचा निर्धार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. वैयक्तिक दुःखाला सामर्थ्यात रूपांतरित करून त्यांनी स्वतःचे नवे अस्तित्व निर्माण केले आणि देशसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवला.
“पती विजय सोनावणे यांचे देशसेवेचे स्वप्न अपूर्ण राहू नये, हीच माझी प्रेरणा होती. त्यांच्या स्मृतींना आदरांजली म्हणून मीदेखील देशसेवा करण्याचा संकल्प केला होता. तो आज पूर्ण झाला. या संपूर्ण प्रवासात भारतीय लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या पाठबळामुळेच हे यश मिळवता आले.”
– सोनल विजय सोनावणे


