वसई प्रतिनिधी
सलग काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहराला भीषण पूरस्थितीचा सामना करावा लागल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच शहरातील पूरनियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी सुविधांबाबत राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यंदाच्या पावसात वसई-विरारमधील अनेक सखल भाग जलमय झाले. शेकडो घरांमध्ये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद पडले, तर काही भागांमध्ये वीजपुरवठा आणि इंटरनेट सेवा तासन्तास खंडित राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पूरस्थितीत नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असून मदतकार्य आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप शिवसेना (उबाठा)ने केला आहे.
शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख प्रथमेश राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात पूरपरिस्थिती अत्यंत गंभीर असताना महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. तसेच इतर वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात दिसले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाकडून तातडीची उपाययोजना, नागरिकांशी समन्वय आणि प्रभावी आपत्ती व्यवस्थापन करण्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राऊत यांनी आपल्या पत्रात वसई-विरारमधील वाढत्या नागरी समस्यांकडेही लक्ष वेधले आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, गटार व्यवस्थेतील त्रुटी, खराब रस्ते आणि अपुऱ्या पावसाच्या निचरा व्यवस्थेमुळे प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मूलभूत प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी बेकायदेशीर बांधकामांना परवानगी दिली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. अशा अनियंत्रित विकासामुळे शहरातील पूरस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.
महापालिका प्रशासनात शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची गरज असल्याचे सांगत राऊत यांनी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कठोर आणि परिणामकारक अधिकाऱ्याची वसई-विरार महापालिकेला आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद केले आहे. नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी तसेच शहरातील प्रशासनाला अधिक जबाबदार आणि उत्तरदायी बनवण्यासाठी मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, पूरस्थितीनंतर शहरातील नागरिकांमध्येही महापालिकेच्या कार्यपद्धतीबाबत नाराजीचे वातावरण आहे. प्रत्येक पावसाळ्यात पूर, वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि मूलभूत सुविधांचा बोजवारा उडत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेने केलेल्या या मागणीकडे राज्य सरकार कोणत्या भूमिकेतून पाहते आणि प्रशासनात काही बदल होणार का, याकडे वसई-विरारकरांचे लक्ष लागले आहे.


