रायगड प्रतिनिधी
आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आज (मंगळवार, १४ जुलै) विविध आंबेडकरी, बौद्ध आणि बहुजन संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एकच आरक्षण पाहिजे’, ‘आरक्षणाचे विभाजन थांबवा’ आणि ‘समान हक्क, सामाजिक न्याय’ या प्रमुख घोषणांसह सकाळी ११ वाजता हा मोर्चा काढण्यात येणार असून, मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरक्षणाचे उपवर्गीकरण (सब-कॅटेगरी) करण्याच्या मुद्द्यावर देशभरात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान हा मोर्चा महत्त्वाचा मानला जात आहे. विविध सामाजिक संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात आरक्षणाच्या मूळ उद्देशाला धक्का पोहोचणार नाही, यासाठी शासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आयोजकांच्या मते, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागास घटकांना मिळणाऱ्या आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करून एकसमान आरक्षण धोरण लागू करण्यात यावे. तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या आधारे आरक्षणाचे न्याय्य वाटप व्हावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, आरक्षणावरील ५० टक्क्यांची घटनात्मक मर्यादा हटवून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करण्याची मागणीही मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे केली जाणार आहे.
खासगी क्षेत्रातही आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, विद्यार्थ्यांसाठी अधिक शैक्षणिक वसतिगृहे उभारावीत, शिष्यवृत्ती योजनांचा विस्तार करावा तसेच सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीय युवकांना प्राधान्य मिळावे, अशा मागण्यांचाही या आंदोलनात समावेश करण्यात आला आहे.
मोर्चाची सुरुवात कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून होणार असून, तेथून मुख्य बाजारपेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे प्रशासकीय भवनावर मोर्चाचा समारोप होणार आहे. समारोपाच्या ठिकाणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे होणार असून, शासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौद्ध महासंघ, चर्मकार बहुजन महासंघ, आदिवासी कृती महासमिती, कर्जत तालुका वाल्मिकी समाज, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तसेच इतर अनेक सामाजिक संघटनांनी संयुक्तपणे केले आहे. विविध जिल्ह्यांतून कार्यकर्ते आणि समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार असल्याने कर्जत शहरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
“शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” आणि “जय भीम, जय संविधान” या घोषणांसह सामाजिक न्याय आणि घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी समाजाने मोठ्या संख्येने एकत्र यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आरक्षणासंदर्भातील विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा निर्णायक ठरेल, असा विश्वासही आयोजकांनी व्यक्त केला आहे.


