मुंबई प्रतिनिधी
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे सेवेत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सोमवारी सकाळी कार्यालयीन गर्दीच्या वेळी टिटवाळा–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मार्गावरील एसी लोकलचे वातानुकूलन यंत्रणा (एसी) अचानक बंद पडल्याने मुलुंड रेल्वे स्थानकात ट्रेन काही काळ थांबून राहिली. बंद दरवाजे, प्रचंड गर्दी आणि हवा खेळती नसल्याने डब्यात घुसमटीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत एका महिलेसह तीन प्रवासी बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली असून, एका प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
At Mulund railway station, the AC in an AC local train on Platform 2 reportedly stopped working for around 10 minutes, causing 3–4 passengers to faint. Railway staff attended to the situation. #MumbaiLocal #CentralRailway #Mumbai #ACLocal @fpjindia pic.twitter.com/OsjYOX8nPu
— Abhishek Kumar Pathak (@ImAbhi5200) July 13, 2026
सकाळच्या गर्दीच्या वेळी नेहमीप्रमाणेच एसी लोकलमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी होते. मुलुंड स्थानकात पोहोचताच ट्रेनच्या वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाला. एसी बंद पडल्यामुळे काही मिनिटांतच डब्यातील तापमान झपाट्याने वाढले. त्यातच एसी लोकलचे दरवाजे स्वयंचलित असल्याने हवा खेळती राहिली नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि काहींना चक्कर येऊ लागली. डब्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुदमरल्यामुळे एका महिलेसह दोन पुरुष प्रवासी बेशुद्ध पडले. इतर प्रवाशांनी तत्काळ महिलेला डब्याबाहेर प्लॅटफॉर्मवर आणून प्राथमिक मदत केली. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि सहप्रवाशांनी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फहीम अन्सारी या प्रवाशाची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेमुळे काही काळ मुलुंड स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालयीन गर्दीच्या वेळी अशा प्रकारचा बिघाड होणे आणि त्यानंतर प्रवाशांना वेळेवर मदत न मिळाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, ही एसी लोकल पुढे कुर्ला स्थानकापर्यंत नेण्यात आली. मात्र तांत्रिक बिघाड दूर न झाल्याने रेल्वे प्रशासनाने संबंधित एसी लोकलची पुढील सेवा रद्द केली. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची स्थानकांवर मोठी गर्दी झाली. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी या एसी लोकलच्या नियोजित पुढील दोन फेऱ्या नॉन-एसी लोकल म्हणून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. खराब झालेला रेक दुरुस्तीसाठी कार्यशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
या घटनेनंतर एसी लोकलमधील आपत्कालीन व्यवस्था, वायुवीजन प्रणाली आणि तांत्रिक देखभालीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गर्दीच्या वेळेत एसी यंत्रणा बंद पडल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने या बिघाडाची चौकशी सुरू केली असून नेमका तांत्रिक दोष कशामुळे निर्माण झाला, याचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.


