मुंबई प्रतिनिधी
आर्थिक राजधानी मुंबईला पुन्हा एकदा एका अमानुष आणि काळिमा फासणाऱ्या घटनेने हादरवून सोडले आहे. दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एका इमारतीतील सार्वजनिक वॉशरूममध्ये घुसून अवघ्या ७ वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षा रक्षकाने (वॉचमन) पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या राक्षसी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, नराधम आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी पायधुनी पोलिस ठाण्याला घेराव घातला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने संतप्त जमावाने रस्त्यावर उतरून ‘रास्ता रोको’ आंदोलन केले, ज्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिस आणि स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित ७ वर्षीय अल्पवयीन बालिका इमारतीमधील वॉशरूममध्ये गेली होती. बालकेला एकटे पाहून तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या वासनांध वॉचमनने तिच्यावर पाळत ठेवली आणि तो जबरदस्तीने वॉशरूममध्ये घुसला. तेथे त्याने या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. या अमानुष कृत्यात चिमुरडी गंभीररीत्या जखमी झाली असून, तिच्या रडण्याचा आवाज ऐकून घटना उघडकीस आली. रक्ताळलेल्या अवस्थेत असलेल्या पीडितेला कुटुंबियांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या क्रूर घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांचा संयम सुटला. शेकडो संतप्त नागरिकांनी थेट पायधुनी पोलिस ठाण्यावर धडक देत पोलिसांना धारेवर धरले. आरोपीला आमच्या हवाली करा, अशी मागणी करत जमावाने पोलिस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या ढिसाळ सुरक्षेविरोधात संताप व्यक्त करत नागरिकांनी मुख्य रस्त्यावर धाव घेत ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
जमावाचा वाढता रोष आणि कायदा-सुव्यवस्थेची बिघडत चाललेली परिस्थिती पाहता, पोलिस प्रशासनाने तातडीने पावले उचलत घटनास्थळी आणि पोलिस ठाणे परिसरात अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संतप्त आंदोलकांशी चर्चा करून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


