मुंबई प्रतिनिधी
माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा आरोपी असलेल्या अनमोल बिश्णोईचा ताबा घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल विशेष मोक्का न्यायालयाने मुंबई पोलिसांवर कठोर ताशेरे ओढले आहेत. हत्या सारख्या गंभीर गुन्ह्याच्या तपासात न्यायालयाला पोलिसांना त्यांच्या कर्तव्यांची आठवण करून द्यावी लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे स्पष्ट शब्दांत नमूद करत न्यायालयाने २४ जुलैपर्यंत आदेशाच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने तपास यंत्रणेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपीचा ताबा मिळवणे, त्याची चौकशी करणे, तपास पूर्ण करणे आणि खटला चालवणे ही तपास यंत्रणेची मूलभूत जबाबदारी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
सुनावणीदरम्यान मुंबई पोलिसांनी कायदेशीर परवानगी मिळाल्यास अनमोल बिश्णोईचा ताबा घेण्यास आम्ही तयार आहोत, मात्र काही व्यावहारिक अडचणी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळत, सक्षम न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला औपचारिक अटक करता येते तसेच तो न्यायालयीन कोठडीत असतानाही त्याची चौकशी करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळवता येते, असे स्पष्ट केले.
उपलब्ध असलेल्या कायदेशीर पर्यायांकडे तपास यंत्रणेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार सर्व आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच आरोपीची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर उपाययोजना करण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना देण्यात आले.
दरम्यान, सिद्दीकी कुटुंबीयांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात बाह्य दबावामुळे मुंबई पोलीस अनमोल बिश्णोईचा ताबा घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला होता. मात्र तपास यंत्रणेने हा आरोप फेटाळून लावत कोणतीही जाणीवपूर्वक दिरंगाई झालेली नसल्याचा दावा केला.
प्रकरण काय आहे?
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री वांद्रे (पूर्व) येथे माजी मंत्री बाबा सिद्दीकी (वय ६६) यांची त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्याकांडात कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्णोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्णोई याचे नाव समोर आले. अमेरिकेतून प्रत्यार्पण झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याला अटक केली असून सध्या तो नवी दिल्लीतील तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी त्याचा ताबा मुंबई पोलिसांना मिळावा, अशी मागणी सिद्दीकी कुटुंबीयांनी न्यायालयात केली असून त्यावरून न्यायालयाने मुंबई पोलिसांना कठोर शब्दांत फटकारले आहे.


