सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील यावली येथे पत्नीच्या कथित प्रेमसंबंधांमुळे सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून आणि मानसिक छळाला कंटाळून 26 वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीसह तिच्या कथित प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत युवकाचे नाव संजय राजाराम राऊत (वय 26, रा. यावली, ता. मोहोळ) असे आहे. तर स्नेहल संजय राऊत आणि सौरभ सदाशिव शिंदे (दोघे रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयचा विवाह स्नेहल हिच्याशी झाला होता. विवाहानंतरही स्नेहलचे तिच्या आत्याच्या मुलगा सौरभ शिंदे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. स्नेहल ही संजयशी बोलणे टाळत होती, सतत भांडणे काढत होती. तसेच, “मला सौरभसोबतच राहायचे आहे, तू मला सोडून दे,” असे सांगून ती त्याला मानसिक त्रास देत असल्याचा फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय सौरभकडूनही संजयला त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकाराची माहिती संजयने आपल्या आई-वडिलांना दिली होती. त्यांनी स्नेहलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे संजय मानसिकदृष्ट्या खचल्याचे सांगण्यात आले आहे.
७ ते ८ जुलैदरम्यान रात्री कुटुंबातील सर्व सदस्य जेवण करून झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय खोलीबाहेर न आल्याने आईने दरवाजा उघडून पाहिले असता, त्याने घरातील लोखंडी पाईपला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी मृताचे वडील राजाराम नागनाथ राऊत (वय 55) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १० जुलै रोजी रात्री उशिरा पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ करीत आहेत.


