डोंबिवली प्रतिनिधी
डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांकडून डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळलेली असतानाच या प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण मिळाले आहे. हल्ल्याचा बळी ठरलेल्या डॉक्टरांनी नोकरीचा राजीनामा देत डोंबिवली शहर कायमचे सोडल्याची माहिती समोर आली आहे. “मी पुन्हा कधीही येथे परतणार नाही,” अशी स्पष्ट आणि संतप्त भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे.
घटनेनंतर जारी केलेल्या निवेदनात संबंधित डॉक्टरांनी भीतीचे भयावह वास्तव मांडले. “मी राजीनामा दिला कारण तिथे प्रचंड भीतीचे वातावरण आहे. गुंड आमच्यावर नजर ठेवून आहेत. मी शहर सोडले आहे. ते अत्यंत धोकादायक लोक आहेत. इतर डॉक्टर तिथे काम करत राहू शकतात, पण मला ते शक्य नाही. मी पुन्हा कधीच त्या रुग्णालयात किंवा त्या शहरात जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
डॉक्टरांच्या या निर्णयामुळे केवळ एका डॉक्टरने नोकरी सोडल्याचा मुद्दा राहिलेला नसून, सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उपचारासाठी दिलेला सल्ला ठरला वादाचे कारण
६ जुलै रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, नवजात बाळाला विशेष उपचारांची गरज होती. मात्र, रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभाग (NICU) पूर्ण क्षमतेने भरलेला असल्याने डॉक्टरांनी बाळाच्या नातेवाईकांना अधिक सुविधा असलेल्या दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा वैद्यकीय सल्ला दिला.
डॉक्टरांनी रुग्णाच्या हितासाठी दिलेल्या या सल्ल्यावरूनच वाद निर्माण झाला. काही वेळातच हा वाद आक्रमक स्वरूप धारण करत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर थेट हल्ला करण्यात आला.
कानशिलात, ठोसे आणि रजिस्टरने मारहाण
घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची गंभीरता अधिक स्पष्ट झाली. व्हिडिओमध्ये नगरसेवक रमेश म्हात्रे एका डॉक्टरच्या कानशिलात मारताना, ठोसे लगावताना तसेच रजिस्टरने त्यांच्या डोक्यावर वार करताना दिसत आहेत. एवढ्यावरच न थांबता एका महिला डॉक्टरच्या हातावरही प्रहार करण्यात आल्याचे दिसून आले.
रुग्णालयातील इतर कर्मचारी भयभीत झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
संतापानंतर पोलिसांची कारवाई
घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या तीन साथीदारांना अटक केली. या घटनेमुळे सरकारवर आणि प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला. त्यानंतर संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले.
डॉक्टरांचे आंदोलन कायम
दरम्यान, महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स संघटनेने आरोपींच्या अटकेचे स्वागत केले असले, तरी केवळ अटक पुरेशी नसल्याचे स्पष्ट केले आहे. डॉक्टरांना कायमस्वरूपी सुरक्षा, रुग्णालयांमध्ये कठोर सुरक्षा व्यवस्था आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी प्रभावी कायद्याची अंमलबजावणी व्हावी, या मागण्यांसाठी संघटनेने काळ्या फिती बांधून आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आरोग्य व्यवस्थेसमोरील मोठा इशारा
एका डॉक्टरला जीवाच्या भीतीने शहर सोडावे लागणे ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नाही, तर संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी दिवस-रात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाच जर सुरक्षिततेची हमी मिळत नसेल, तर सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा देण्यास इच्छुक डॉक्टरांची संख्या कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ आरोपींवर कारवाई करून न थांबता डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.

