मुंबई प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाजवळ स्लॅब कोसळल्याच्या घटनेवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “स्वत:च्या अंगाशी आलं की विरोधकांचं राजकारण आठवतं. इतकी वर्षे तुम्ही विरोधात असताना काय करत होतात?” असा थेट सवाल करत राज ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर कडाडून टीका केली.
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प, राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार, रस्त्यांची दुरवस्था, कंत्राटी पद्धतीतील भ्रष्टाचार आणि सार्वजनिक कामांच्या गुणवत्तेवर भाष्य करत सरकारला लक्ष्य केले.
‘मिसिंग लिंक’वर प्रश्न विचारला म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही
राज ठाकरे म्हणाले की, विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मिसिंग लिंक’ दुर्घटनेवरून राजकारण करू नये, असे आवाहन केले होते. मात्र, लोक सार्वजनिक प्रकल्पांबाबत प्रश्न विचारत असतील तर तो महाराष्ट्राचा अपमान कसा ठरतो? लोक सरकारला जाब विचारत आहेत, राज्याचा अपमान करत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
“जेव्हा तुम्ही विरोधात होता तेव्हा प्रत्येक दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरत होता. आता तुमच्यावर प्रश्न उपस्थित झाले की त्याला विरोधकांचं राजकारण म्हणता. ही दुटप्पी भूमिका जनतेला मान्य होणार नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
‘राम मंदिरात चोरी झाली तर त्यावरही बोलू नये का?’
राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. “राम मंदिरात चोरी झाली असे म्हटले की धर्माचा अपमान झाला असे सांगितले जाते. पण चोरी झाली असेल तर त्याबद्दल बोलायचे नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी दावा केला की, राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा भाजपच्या एका खासदारानेच उपस्थित केला होता. मंदिराच्या ट्रस्टमधील बहुतांश विश्वस्तांची नियुक्ती केंद्र सरकार करत असताना या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.
“जर दुसऱ्या पक्षाचे सरकार असते आणि राम मंदिरात अशा प्रकारचे आरोप झाले असते, तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभर आंदोलन केले असते. मग आता शांतता का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर आरोप
राज ठाकरे यांनी राज्यातील सार्वजनिक बांधकामांवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. “आज सरकारी कंत्राटे मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा आहे. काम सुरू होण्यापूर्वीच मोठा हिस्सा लाच म्हणून द्यावा लागतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उरलेल्या पैशांत दर्जेदार काम होणे शक्यच नसते आणि त्याचा परिणाम म्हणजे खड्डेमय रस्ते व निकृष्ट दर्जाची कामे,” अशी टीका त्यांनी केली.
‘ब्रिटिशांनी बांधलेलं आजही टिकतं; आपण मात्र…’
सार्वजनिक बांधकामांच्या गुणवत्तेची तुलना करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे उदाहरण दिले. “ब्रिटिश काळात बांधलेले सीएसएमटी आजही लाखो प्रवाशांचा भार समर्थपणे पेलत आहे. अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग अवघ्या १४ महिन्यांत उभी राहिली आणि आजही भक्कम आहे. ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांची हमी संपल्यावरही त्याची माहिती देणारी पत्रे येतात. आपल्या देशात अशी जबाबदारी आणि गुणवत्तेची परंपरा का दिसत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारवर वाढता राजकीय दबाव
‘मिसिंग लिंक’ दुर्घटनेनंतर राज्य सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना आता मनसेनेही आक्रमक भूमिका घेतल्याने हा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हे आहेत. पावसाळ्यातील पायाभूत सुविधांची गुणवत्ता, सार्वजनिक कामांमधील पारदर्शकता आणि कंत्राटी व्यवस्थेतील भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून आगामी काळात राज्यातील राजकारण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


