मुंबई प्रतिनिधी
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील कर्जत-लोणावळा घाट विभागात झालेल्या भूस्खलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही विस्कळीत राहिली आहे. ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिनदरम्यान दरडी कोसळल्याने या महत्त्वाच्या मार्गावरील रेल्वेसेवेवर मोठा परिणाम झाला असून, पुढील दोन दिवसांसाठी तब्बल १४ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, काही गाड्या पुण्यापर्यंतच मर्यादित करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या मूळ स्थानकाऐवजी पुण्याहूनच सुटणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने आज दुपारी मंगळवारी दुपारी प्रसिद्ध केलेल्या अद्ययावत निवेदनात दिली.
गेल्या २४ तासांत घाटमाथ्यावर झालेल्या विक्रमी पावसामुळे कर्जत-लोणावळा दरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. परिणामी रेल्वे रुळांवर माती, दगड आणि झाडे आल्याने वाहतूक सुरक्षिततेच्या कारणास्तव काही काळ पूर्णपणे बंद ठेवावी लागली. रेल्वे प्रशासनाने तातडीने यंत्रणा घटनास्थळी पाठवून मलबा हटविण्याचे आणि मार्ग पूर्ववत करण्याचे काम सुरू केले असले, तरी प्रतिकूल हवामानामुळे दुरुस्तीचे काम सावधगिरीने करावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
१४ गाड्या रद्द
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी सुटणारी पुणे-भुज एक्सप्रेस (११०९२) रद्द करण्यात आली आहे.
७ जुलै रोजी पुणे-सोलापूर इंटरसिटी (१२१६९), सोलापूर-पुणे इंटरसिटी (१२१७०), पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्सप्रेस (२२१०६), पुणे-सीएसएमटी इंटरसिटी (१२१२८), पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस (११००८), सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन (१२१२३), पुणे-सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस (१२१२६), सीएसएमटी-पुणे प्रगती एक्सप्रेस (१२१२५), सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस (११००९), सीएसएमटी-धुळे एक्सप्रेस (११०११), धुळे-सीएसएमटी एक्सप्रेस (११०१२) आणि सातारा-दादर एक्सप्रेस (११०२८) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच ८ जुलै रोजी सुटणारी भुज-पुणे एक्सप्रेस (११०९१) देखील रद्द करण्यात आली आहे.
कोयना एक्सप्रेस अंशतः रद्द
सीएसएमटी-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस (११०२९) ही गाडी सीएसएमटी ते खडकीदरम्यान रद्द करण्यात आली असून, ती खडकी स्थानकापासून नियोजित वेळेनुसार पुढे धावणार आहे.
पाच लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले
घाट विभागातील वाहतूक सुरळीत होईपर्यंत काही गाड्यांना पर्यायी मार्गाने चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चेन्नई-सीएसएमटी एक्सप्रेस (२२१६०), नांदेड-पनवेल एक्सप्रेस (१७६१४) आणि कोईम्बतूर-एलटीटी एक्सप्रेस (११०१४) या गाड्या दौंड-मनमाड-इगतपुरी-कल्याण मार्गे वळविण्यात आल्या आहेत.
तर वेलंकन्नी-डहाणू रोड विशेष (०९०२९) आणि यशवंतपूर-बाडमेर एक्सप्रेस (१४८०५) या गाड्या दौंड-मनमाड-जळगाव-पालधी-सुरत मार्गे धावतील.
काही गाड्या पुण्यापर्यंतच
भूस्खलनामुळे हुबळी-दादर एक्सप्रेस (१७३१७), हैदराबाद-सीएसएमटी एक्सप्रेस (२२७३१) आणि सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस (२२२२६) या गाड्या पुणे स्थानकापर्यंतच धावतील.
तर दादर-हुबळी एक्सप्रेस (१७३१८), सीएसएमटी-सिकंदराबाद एक्सप्रेस (१२७०१) आणि सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (२२२२५) या गाड्या त्यांच्या मूळ स्थानकाऐवजी पुणे स्थानकावरूनच पुढील प्रवासासाठी सुटतील.
नांदेड एक्सप्रेसच्या वेळेत बदल
सीएसएमटी-नांदेड एक्सप्रेस (२०७०६) ही गाडी ७ जुलै रोजी दुपारी १.१५ वाजता सुटण्याऐवजी दुपारी ३.१५ वाजता सुटणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.
विक्रमी पावसामुळे संकट
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ २४ तासांत घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत-लोणावळा विभागात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. अधिकृत आकडेवारीनुसार, लोणावळा परिसरात सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंतच्या २४ तासांत तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे रेल्वे रुळांवर माती आणि दगडांचा मोठा ढिगारा साचला असून, मार्ग सुरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी संबंधित गाडीची अद्ययावत स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे वाहतुकीवर परिणाम कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


